टॉप न्यूज

सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी...!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
''सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी, निवार्णाकडे-निर्वाणम्-शांतम्...'' आयुष्यभर विद्रोही टाहो फोडताना सर्व धर्म अनित्य आहेत, असं सांगून सम्यकाचं बोट धरा, असं कळवळून सांगणारे पँथर महाकवी नामदेव ढसाळ आज अनंतात विलीन झाले. वंचित घटकांना जगण्याची दिशा देणारा, हक्काचा लढा लढण्यासाठी 'दलित पँथर' संघटना सुरू करुन आपल्या ताकदीची जाणिव दलित तरुणांना करुन देणारा, आणि हे सर्व करताना आपल्या साहित्यातून वैश्विक मूल्यभान देणारे ढसाळ सध्याच्या काळातील क्रांतीकारी नामदेव होते.  
 

नामदेव ढसाळ अनेक वर्षांपासून 'मायस्थेनिया ग्रॅव्हीज' या दुर्धर आजारानं ग्रस्त होते. त्याच्याशी यशस्वी दोन हात करतचं त्यांचा जीवनप्रवास सुरू होता. परंतु अलिकडं त्यांना कॅन्सरनं गाठलं आणि शरीर पोखरायला सुरवात केली. दोन महिन्यांपूर्वी उपचारासाठी ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्यावेळी कॅन्सरशीही मी दोन हात करीन...असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. उपचारांना ते चांगली साथही देत होते. पण प्रकृतीत सातत्यानं चढउतार होत होते. सोमवारी प्रकृती अधिकच खालावल्यानं त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यात यश आलं नाही. पहाटे चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. आज सायंकाळी चैत्यभूमीवर हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. राज्यभरातून आलेल्या पॅंथर सैनिकांनी ढसाळांचा विद्रोह कायम जागा ठेवण्याचा निर्धार करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

22dhasalसत्तरच्या दशकातला झंझावात...

1970 च्या दशकात महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या विरोधात एक आवाज घुमला. त्याचं नाव होतं दलित पँथर. दलित पँथरच्या संस्थापकिय त्रिमुर्तींध्ये होते नामदेव ढसाळ, ज. वी. पवार, आणि राजा ढाले. दलित तरुणांच्या प्रक्षोभाचं एक मोहोळ दलित पँथरनं तयार केलं. वंचितांच्या शोषणाविरुद्ध अमेरिकेतील ब्लॅक पँथर चळवळीच्या धर्तीवर एक आक्रमक संघटना असावी अशी त्यामागची भूमिका होती. नामदेव ढसाळ, राजा ढाले यांच्यासारखे कवी, साहित्यिक, उच्च शिक्षित दलित तरुण या चळवळीचे बिनीचे कार्यकर्ते झाले. आजच्या सारखी चळवळी, संघटना किंवा राजकीय पक्ष उभारण्यासाठी पैशाचं पाठबळ घेण्याची त्यावेळची गरज नव्हती आणि मानसिकताही. आपल्या मुलुखमैदानी वक्तृत्वाच्या जोरावर नामदेव ढसाळ यांनी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात जाऊन अन्याय अत्याचारांच्या विरोधात पँथरच्या पंजात ताकद एकवटली. त्यामुळंच त्यावेळच्या प्रस्थापित अत्याचाराच्या मानसिकतेत लडबडलेल्यांना दलित पँथरची धास्ती होती.

 

वैश्विक मूल्यभान देणारा साहित्यिक

दलित पॅंथर हीच एक नाददेव ढसाळ यांची ओळख नाही. दलितांचे, शोषितांचे जीवन भोगलेला, अनुभवलेले ते सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होते. नामदेव ढसाळांचे बालपण मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये गोलपीठा भागात अत्यंत गरीबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली.गोलपिठा या कविता संग्रहामुळं नावारुपाला आलेले तरुण तडफदार कवी नामदेव ढसाळ हे लिटील मॅगझिन, आणि काही काळ राष्ट्रसेवादलसारख्या सामाजिक संघटना आणि चळवळींशीसुद्धा संबंधित होते. समाजातील साहित्य आणि कवितेच्या क्षेत्रात विद्रोहाचं ज्वलंत प्रतिक म्हणुन नामदेव ढसाळांचा चेहरा आग्रक्रमानं पुढं यायचा. मुंबईतल्या वेश्या वस्त्यांपासुन ते कत्तलखान्यापर्यंत आणि मुंबई नगरीच्या आश्रयाला आलेल्या स्थलांतरीत दलित वस्त्यांपासुन ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत नामदेव ढसाळांचा वावर हा खऱ्या पँथरसारखाच होता. ढसाळांची कविता वैश्विक होती. केवळ अंडरवर्ल्डपर्यंत मर्यादित न राहता जागतिक मानवी संस्कृतिचा वेध नामदेव ढसाळांच्या कवितांमध्ये होता. मुंबईतल्या कामगार वस्त्यांमधला नाद आणि कत्तलखान्यांमधली सांकेतिक भाषा...कामगारांच्या जगण्यातलं यांत्रिकीकरण आणि मोहेंजदडो ते माया संस्कृती इथपर्यंत घतलेला ठाव आणि यांसारख्या वैश्विक कॅनव्हासमुळं नामदेव ढसाळ 1960 नंतरच्या कालखंडातले सर्वश्रेष्ठ कवी ठरले. आपल्या विशिष्ट शैलीनं त्यांनी मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घातली. प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरून मराठीला समृद्ध करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी नामदेव ढसाळ एक आहेत.

 

Untitled-1 copyजातीय अभिसरणाचा प्रयोग... 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सच्चे पाईक होते. आंबेडकरी विद्रोही विस्तवावर वेळोवेळी फुंकर घालून तो विझू न देण्याची खबरदारी त्यांनी घेतली. तरीही वेळ आली त्यावेळी त्यांनी शिवसेनेसारख्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनेशी हातमिळवणी केली. याबद्दल त्यांच्यावर टिकाही झाली. पण समाजाच्या विकासासाठी हे जातीय अभिसरण ही गरजेची गोष्ट आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आणि शेवटपर्यंत ते त्यावर ठाम राहिले. राजकारणात केलेला हा जातीय अभिसरणाचा प्रयोग हे ढसाळांच्या राजकीय जीवनातली ठळक टप्पा म्हणावा लागेल. नामदेव ढसाळ यांची 'गोलपिठा'मधली 'माणसाने' नावाची कविता असो किंवा 'या सत्तेत जीव रमत नाही' यासारखी कविता असो. एक प्रचंड अनुभव संपन्न समष्टीच्या प्रेमात आकंठ बुडालेलं असं हे एक कलंदर व्यक्तिमत्व होतं, याची प्रचिती यामुळं येते.

 

dhasal 1

 

नामदेव ढसाळ यांचा जीवन प्रवास

 

कविता संग्रह
गोलपीठा (१९७२)
खेळ (१९८३)
मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५)
तुही यत्ता कंची (१९८१)
या सत्तेत जीव रमत नाही (१९९५)
मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात
तुझे बोट धरुन चाललो आहे
आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी (१९७६)
गांडू बगीचा (१९८६)

 

नाटक
अंधार यात्रा

 

कादंबरी
हाडकी हाडवळा
निगेटिव स्पेस्

 

इतर
आंधळे शतक
मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह)

 

नामदेव ढसाळांना मिळालेले मानसन्मान

पद्मश्री - १९९९

महाराष्ट्र शासन पुरस्कार - १९७३, १९७४, १९८२, १९८४

सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार - १९७४

साहित्य अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार - २००४

 

 

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.