पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकरांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कसल्याही परिस्थितीत मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची घोषणा केली होती. परंतु अनेक मार्गांनी तपास करूनही हत्येचे धागेदोरे अद्याप तपास यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत. सामान्यत: महिन्याच्या फरकानं काही संशयितांना ताब्यात घेतल्याचं जाहीर करण्यात आलं. प्रत्येक वेळी खुनी लवकरच सापडतील असं वातावरण निर्माण होत असतानाच शेवटी पदरी निराशाच येत होती. गोवा, पुणे, सातारा, कर्हाड अशा अनेक ठिकाणांहून पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेतले पण हाती काहिच लागलेले नाही. पोलिसांच्या या निष्क्रीयतेबद्दल समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मध्यंतरी तिखट भाषेत पुणे पोलिसांचे कान उपटले होते. पाच महिने उलटूनही तपास होत नाही म्हटल्यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खुनाचा तपास सीबीआयकडं देण्याचे सुतोवाच नुकतेच केलेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज ही फेसबुकवरुन मोहीम राबवण्यात आली. अलिकडच्या काळात सोशल नेटवर्कींगवरचा आवाज बुलंद होत चाललाय. फेसबुकच्या माध्यमातून उमटलेला आवाज तरी राज्यकर्त्यांच्या कानी पडेल, या उद्देशानं आज फेसबुकवरील पुरोगामी विचारांच्या लाखो जणांनी आपले प्रोफाईल फोटो काळे करुन सरकारचा निषेध नोंदवलाय.
'ब्लॅक प्रोफाईल मूव्हमेंट'
फेसबुकवर 'ब्लॅक प्रोफाइल मूव्हमेंट' या नावानं अकाउंट तयार करण्यात आलं असून त्यावर (सोमवारी) पहाटेपासून "खरे मारेकरी कोण?' असा प्रश्न राज्यभरातील लाखो युवकांनी विचारलाय. ज्यांनी आपला प्रोफाईल फोटो काळा केलेला नाही ते या चळवळीत सहभागी नाहीत, असे समजायचेही कारण नाही. अनेक जणांनी तसं नमूद करुन या मोहीमेला पाठिंबा दिलाय. प्रोफाईल फोटो काळा न केलेल्या लाखो फेसबुककरांनी ज्या आपल्या मित्र-मैत्रिनींनी प्रोफाईल फोटो काळा करुन यात भाग घेतलाय त्यांना लाईक करुन उचित प्रतिक्रियाही देखील टाकल्यात. या आंदोलनाला राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समिती, युवक क्रांती दल, युवा भारत, छात्रभारती, सर्वधर्मीय पंथीय संघटना, आनंदवन मित्रमंडळाबरोबरच समविचारी परिवर्तनवादी संघटनांनी पाठिंबा दिलाय.
फेसबुकवरील प्रतिक्रिया....
रवी लाखे, मुंबई - दाभोळकरांसारखे ज्यांनी आपला जीव तुमच्या जगण्याच्या वाटेवर ओवाळून टाकला आहे. तो न ओलांडता पुढे जाण्यासारखे हे काहीतरी वाटते. असो. मी निषेधात सामील झालो आहेच.
गजू तायडे, मुंबई - 'इथं फेसबुकावर काळं प्रोफाइल करून काय होणार?' हा प्रश्नच अनाठायी आहे. अनेक मित्रांचे ब्लॅक प्रोफाइल पाहून अजून संवेदनशीलता, solidarity वगैरे अस्तित्वात आहेत हे जाणून बरे वाटले. मात्र ज्यांनी प्रोफाइल ब्लॅक केले नाही त्या सगळ्यांनाच 'दाभोलकरांचे मारेकरी पकडले जाऊ नयेत असे वाटते' असा तर्क काढू नये, ही नम्र विनंती.
हर्ष झिंबरे - एकीकडं डॉक्टर दाभोलकरांचे खुनी मिळत नाहीत...
आणि दुसरीकडं बॉलीवुड अभिनेता संजय दत्त ला ३० दिवसाचा पैरोल मिळत आहे....
रवि सहाणे, पुणे - ''मी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर बोलतोय'' २० ऑगस्ट २०१३ रोजी म्हणजे बरोबर पाच महिन्यांपूर्वी मी सकाळी नेहमीप्रमाणं ओंकारेश्वर पुलावर प्रभातफेरी करीत असताना अचानक मागून डोक्यात सुसाट वेगानं काहीतरी घुसलं आणि काय ते कळायच्या आत प्रचंड वेदनेत मी गतप्राण झालो. ...नंतर कळलं माझ्यावर दोघा जणांनी गोळीबार केला.. का केला, कोण जाणे. आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मुलनासाठी झटलो. वाईट प्रथांपासून भोळ्याभाबड्या लोकांना वाचवण्यासाठी झटलो, पण काही क्षणार्धातच मी गतप्राण झालो .वाईट याचं वाटतं की अजून खूप काही करायचं होतं. पण आता तुम्हीच हे कार्य करीत आहे हे पाहून बरं वाटतं. माझी हत्या होवून पाच महिने झाले तरी सरकार अजून खऱ्या मारेकऱ्यापर्यंत पोहचली नाही. किंबहुना ते पोहचू इछ्चितच नाही. माझी सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की या सरकारवर भरवसा ठेवून तुम्ही वेळ वाया घालवू नका, तुमचा बहुमुल्य वेळ जनतेच्या जागरणासाठी लावा माझे कार्य पुढं वाढवत रहा. हे सरकार ढोंगी आहे, त्याचा जाब जनता येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच विचारेल आणि आता मी गप्प नाही बसणार. बघितली पाच महिने यांची नाटकं. भेटीन सर्वांना जे जे अपराधी आहेत त्यांना, येणाऱ्या काळात दिसेलच सर्वांना--
कळावे,
आपला नरेंद्र दाभोळकर ...{काल्पनिक भावना }
निखील कुलकर्णी कोल्हापूर - दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध म्हणजे पुणे पोलिस आणि गृहखात्यानं मांडलेला खेळच वाटतोय! कोण कुठले तरुण येतात काय, पोलीस स्टेशनासमोर गाडी लावतात काय आणि दिवसाढवळ्या दाभोलकरांना मारून जातात काय? आज ५ महिने झाले तरी या सरकारला एकही गुन्हेगाराला पकडता येऊ नये? यावरून स्पष्ट होतंय की हे निलाजरं सरकार कुणाला तरी पाठिशी घालतंय! काय तर म्हणे सीसीटीव्ही फुटेज नीटच नव्हतं, ते कुठं परदेशात पाठवून आम्ही सुधारवून घेतलं तरी पण नीट काही दिसत नाही.. ह्यांव अन त्यांव..! ह्या भ्याड हल्ल्याचं कोणीतरी लाइव्ह शुटींग करून जरी यांना दाखवलं असतं तरी यांना दिसलंच नसतं, कारण एकच "आंधळेपणाचे सोंग" ! आता हे सोंग घेतलेल्या पोलीस खात्याला कोण काय दाखवणार? अजूनही गृहखाते म्हणतंय की दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना आमचे पोलीस पकडतील, तेवढे आम्ही सक्षम आहोत. अजूनही हीच टेप वाजवताय? या सरकारचे फक्त डोकेच नव्हे तर नैतिकताही ठिकाणावर नाही!
Comments
- No comments found