टॉप न्यूज

रास्ता रोको आंदोलन 'मनसे' स्थगित!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
मनसेनं टोल विरोधात राज्यभरात सुरू केलेला 'रास्ता रोको' पेटणार, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर केलं. आंदोलनासाठी वाशीकडं येण्यासाठी सकाळी बाहेर पडलेल्या ठाकरेंना चेंबूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर दोन तासानंतर कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करत असल्याचं जाहीर करीत ते आल्या पावली कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानी परतले. त्यानंतर पोलीस यंत्रणेसह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

  

raj

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेत इशारा दिल्याप्रमाणं टोल विरोधातील रास्ता रोको आंदोलनं सकाळपासून पेटायला सुरवात झाली होती. ठिकठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यानं राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आंदोलनासाठी दादरहून वाशीकडं जात असताना पोलिसांनी चेंबूरजवळ त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवून ठाकरे यांच्यासह, मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर, आमदार नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेतलं. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी त्यांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. राज यांचा रस्ता पोलिसांची अडवल्याचं समजताच आक्रमक होत कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी राज यांना सोडून दिले. चेंबूर पोलीस ठाण्यातून बाहेर पडलेल्या राज यांनी आंदोलन स्थगित करत असल्याचं जाहीर केलं. ''माझ्या भावना ह्या जनतेच्या भावना होत्या. त्या सरकारपर्यंत पोहोचवणं हा माझा उद्देश होता. मुख्यमंत्र्यांनी फोन करुन उद्या सकाळी नऊला चर्चेसाठी बोलावलंय. त्यामुळं त्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्यानं आंदोलन स्थगित करतोय, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 

कार्यकर्ते आक्रमक, तोडफोड, दगडफेक 

मनसेनं राज्यातील मनमानी टोल वसुली विरोधात गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेत काही टोलनाक्यांची तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या सभेत राज यांनी आणखी आक्रमक होत 12 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार आज सकाळपासूनच राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. हे आंदोलन केवळ हायवेंवर होईल, असं ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केल्यानं राज्यभरातील हायवेंवरील वाहतूक सकाळपासून विस्कळीत झाली होती. आंदोलन हिंसक पद्धतीनं करू नका, असं आवाहन करण्यात आलं होतं तरी दुपारी बारापर्यंत नाशिक, औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणी काही खासगी वाहने आणि एसटींवर दगडफ करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. आमदार प्रवीण दरेकर यांनाही पोलिसांनी दहिसरजवळ ताब्यात घेतलं.

  

शर्मिली ठाकरेही उतरल्या रस्त्यावर
राज ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजाच राज यांच्या पत्नी शर्मिली ठाकरे यादेखील रस्त्यावर उतरल्या. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन सुरू असताना राज यांना अटक केल्याबद्दल संताप व्यक्त करून त्यांनी राज यांना ज्या पोलीस ठाण्यात ठेवलंय त्याच्या बाहेर मी धरणे आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. यामुळं राज्यभरातील कार्यकर्ते आक्रमक होऊन रस्त्यावर उतरल्यानं आंदोलन पेटणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता आंदोलन स्थगित सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला. 

 

निवडणुकीच्या तोंडावर राजकारण - मुख्यमंत्री
राज ठाकरे यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. पण ते आले नाहीत. निवडणुकांच्या तोंडावर त्यांना या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे. प्रश्न सोडवण्यात त्यांना रस नाही. आम्ही टोल पॉलिसीचा पुनर्विचार करीत आहोत, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी म्हटलं होतं.

 

आंदोलनाचा घटनाक्रम....

सकाळी १०.०२ वाजता

राज ठाकरे आंदोलनासाठी कृष्णकुंजवरून रवाना
वाशी टोल नाक्याकडे राज यांची कुच

 

सकाळी १०.३५ वाजता
चेंबूर पोलिसानी ताफा अडवला.
नितीन सरदेसाई, बाळा नादगावकर यांनी पोलिसांशी चर्चा केली. गाडी सोडा नाहीतर इथंच बसू सांगितलं... त्यानंतर राज ठाकरे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.

वाशी येथे मोठा पोलीस फौजफाटा तैनात. दुपारी साडेबाराच्या सुमारास राज यांना सोडण्यात आलं. त्यानंतर आंदोलन स्थगित केल्याचं राज यांनी जाहीर केलं.

 

बीड :

सकाळी ९.२० वाजता
धुळे-सोलापूर हायवेवर पेंडगावजवळ
मनसेचा रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत

 

नाशिक:

सकाळी ९.१५ वाजता

मनसे आमदार वसंत गीते यांच्यासह १३ नगरसेवकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सकाळी ९.००वाजता

निफाड हायवेवर आंदोलन सुरू
नाशिक टोल नाक्यावर महिला आक्रमक...टोलनाक्यावर गाड्या रोखल्या.

पोलिसांची नाकाबंदी

-आंदोलनाचा बारावीच्या परीक्षेवर परिणाम नाही

-शाळा, रिक्षा, टॅक्सी सुरू

 

सकाळी ७.३० वाजता
ठाण्यात रिक्षांची तोडफोड, दोन ठिकाणी टायर जाळलेत...

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर तीन हात नाक्याजवळ अज्ञात व्यक्तींनी टायर जाळलेत. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.