टॉप न्यूज

बळीराजालाही 'व्हॅलेंटाइन डे' हॅपी!

ब्युरो रिपोर्ट, पुणे/कोल्हापूर
जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन 'व्हॅलेंटाइन डे'साठी सज्ज झालीय. पण तुम्हाला माहितेय काय... त्यांच्या हातातल्या बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक येथील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, ग्रीस, स्वीडन आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले गेलेत. यामुळं थोडेथोडके नव्हेत तर सुमारे २० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहेत. याशिवाय देशातील मुंबई, दिल्ली, बेंगळूरु, कोलकाता आदी मोठ्या शहरात फुले जातील ती वेगळीच. मग 'रेड रोझ' हातात घेऊन शेतकऱ्यानंही 'हॅपी व्हॅलेंटाइन डे' म्हटलं तर बिघडलं कुठं भाऊ?

 red roses thumb

 

गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यात वाढणार
सध्या युरोपमध्ये थंडीचा कडाका भलताच वाढलाय. त्यामुळं तिथली गुलाब फुले म्हणावी तशी फुललेली नाहीत. त्यामुळं 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्तानं भारतात तयार होणाऱ्या गुलांबाना विदेशामध्ये यंदाही मोठी आहे. पुणे, सांगली, सातारा आणि अहमदनगर या भागातून सुमारे एक कोटीच्या आसपास गुलाब विदेशात पाठवण्यात येणार असून ही उलाढाल सुमारे १८ ते २० कोटींपर्यंत जाईल, अशी माहिती तळेगाव दाभाडे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या सूत्रांनी दिलीय. 'व्हॅलेंटाइन डे'साठी गुलाब फुलांच्या निर्यातीस २४ जानेवारीपासून सुरुवात होते, ती फेब्रुवारीपर्यंत कायम असते. यंदा 'व्हॅलेंटाइन डे'साठी सुमारे दोन कोटी गुलाबांची निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी गेल्या काही दिवसांत ८० लाख गुलाबांची निर्यात झाली असून अजून ती सुरूच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबाच्या निर्यातीमध्ये १० ते २० टक्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. युरोपमध्ये थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चांगल्या प्रतीच्या गुलाबांना नेदरलॅन्ड, युरोप, स्विर्त्झलंड, युरोप, जपान याठिकाणी मागणी आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

 

जपानमधील मागणी वाढली
'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्तानं झालेल्या गुलाबाच्या निर्यातीतून गेल्यावर्षी सुमारे नऊ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. यंदा मागणी वाढलीय भारताबरोबरच इथियोपियामधून कट फ्लॉवर्सला मोठ्या प्रमाणात मागणी होतेय. भारतातील फुलांची किंमत आफ्रिकन फुलांच्या तुलनेत कमी आहे. जपानमध्येही 'व्हॅलेंटाइन डे' चे महत्व वाढू लागले असून तिथं यावेळी भारतातील फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीय, वाढू लागली आहे. 'व्हॅलेंटाइन डे'साठी ऑस्ट्रेलियामधील खरेदीदारांनी पुणे आणि बेंगळुरुमधून २० लाख फुलांचे बुकिंग केल्याची माहिती इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनल संस्थेचे अध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी दिलीय.

 

Rose 3पंचगंगाकाठचे मळे बहरले
कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडिग्रे तसंच जयसिंगपूरजवळील ग्रीन हाऊसमधून यंदाही गुलाबांची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली. शिरोळ तालुक्यातील कोडिंग्रे या गावी श्रीवर्धन बायोटेकच्यावतीने हरितगृहात गुलाबाची शेती केली जाते. साथी माजी आमदार सा. रे. पाटील यांनी या फार्मची पायाभरणी केलीय, आता त्यांची तिसरी पिढी त्याचा कार्यभार सांभाळते. या फर्ममध्ये १०३ एकरांपैकी बहुतांश क्षेत्रात केवळ गुलाब शेती केली जाते. त्यात रेड, यलो, पिंक यासह विविध रंगांच्या आणि रेड अप्पर क्लास, ग्रँडगाला, समुराई, बिग बी, गोल्ड स्टाईल, स्प्रिंक्स, स्कायलाईन, शकिरा, नोबलेस यासह विविध जातींच्या गुलाबांच्या फुलांचं उत्पादन घेतलं जातं. 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी फुलं तयार व्हावीत, या दृष्टीनं त्यांचं नियोजन केलं जातं. दोन महिने आधी झाडांची छाटणी केली जाते. नंतर झाडावर आलेल्या कळ्यांची काळजी घेतली जाते. थंडीपासून त्यांचं संरक्षण केलं जातं. वेळोवेळी औषध फवारणी करण्यात येते. ठिबक पद्धतीनं खतं दिली जातात. कळ्यांना योग्य आकार यावा यासाठी कॅप बसवल्या जातात. 'व्हॅलेंटाईन डे'च्या अगोदर या कळ्या १४ ते १७ इंच देठ ठेवून तोडल्या जातात. नंतर त्यांचं पॅकिंग केलं जातं. विशेषतः जपान, स्वीडन, ग्रीससह अन्य देशांत ही फुलं पाठवली जातात. त्यापासून देशाला सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांचं परकीय चलन मिळतं.

 

मागणी २० टक्क्यांनी वाढली
यंदाच्या व्हॅलेंटाईन डे साठी गतवर्षी पेक्षा मागणीमध्ये सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. ग्रीस व ऑस्ट्रेलियाला प्रत्येकी दीड लाख, जपान व दुबईला प्रत्येकी ५० हजार, लंडनला १ लाख गुलाबाची फुले निर्यात केली जाणार आहेत. ग्रँड गाला, अप्पर क्लास, सामुराई, फस्ट रेड, बिग बी या जातीच्या लाल गुलाबांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. मुंबई, बेंगलोर, हैद्राबाद, दिल्ली, चेन्नई इथंही फुलांना चांगली मागणी आहे, अशी माहिती देण्यात आली.

 

Rose 1मावळातूनही निर्यात
पुणे जिल्ह्यातील मावळातील फ्लोरिकल्चर पार्कमध्ये दिड हजारांवर शेतकरी फूलशेती करतायत. इथूनही लाल गुलाबाच्या फुलांचंच उत्पादन सर्वाधिक होतं. निर्यातीसाठी अनेक शेतकऱ्यांनी कार्पोरेट कंपन्यांबरोबर करार केलेत. यंदा गारठा चांगलाच होता. त्याचा फटका काही प्रमाणात गुलाब फुलांना बसलाय. कळीला असतानाच फुलं गोठल्यानं उत्पादन कमी झाल्याची माहिती सदानंद दाभाडे या शेतकऱ्यानं दिली. मोठ्या प्रमाणात फुलांची निर्यात झालीय. त्याचबरोबरच पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, पाटणा, रांची, पाटणा, चंदीगढ, अहमदाबाद, लखनौ, हैदराबाद, आदी देशांतर्गत बाजारपेठेत फुलं मोठ्या प्रमाणात पाठविण्यात आलीत. त्यातून सुमारे सात कोटींपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे. गतवर्षी एका फुलाला प्रतवारीनुसार पाच ते नऊ रुपये भाव मिळाला होता आणि स्थानिक बाजारपेठेतून ६० लाख फुलांची विक्री झाली होती. तुटवडा आणि मागणीमुळं यंदा एका फुलाला प्रतवारीनुसार १० ते १५ रुपये मिळतो आहे. त्यामुळं गुलाब उत्पादक शेतकरी खूष आहे. यामुळं ग्रामीण भागातल्या सुमारे दहा हजारांवर लोकांना रोजगार मिळालाय. त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.