डांगी ही घोटी-इगतपुरीतील मूळ जात
नाशिक जिल्ह्यातील घोटी-इगतपुरी भाग हा डांगी बैलांची खाण समजला जातो. भारतात गाई-बैलांच्या ज्या उत्कृष्ट जाती आहेत त्यात या डांगी बैलाचाही समावेश आहे. ही जात मूळ खास करुन घोटी-इगतपुरी भागात विकसीत झालीय. इथल्या भौगोलिक वातावरणात तिच टिकाव धरू शकते, असं आता अनुभवावरुन लक्षात आलंय. त्यामुळं तिची जपणूक म्हणजे या भागाच्या भौगोलिक आणि सांस्कृतिकतेची जपणूक. ही बाब शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवून त्यांना संकरीतपणापासून बाजुला काढून ही डांगी मूळ जात जपण्यासाठी प्रोत्साहित करणं, या उद्देशानं या स्पर्धा घेण्यात आल्या.
घोटी नगरपालिका तर गेली ४४ वर्ष दर वर्षी डांगी बैलांचं प्रदर्शन आणि स्पर्धा भरवते. स्पर्धेतील विजेत्या डांगी बैलांच्या मालकांना 'भारत४इंडिया.कॉम' तर्फे ढाल आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसंच घोटी नगपालिकेतर्फे सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख पाच हजार रुपये रोख रक्कम देऊन या बैलाचा सन्मान करण्यात आला.
बक्षिसं देण्याची पद्धत
जे बैल स्पर्धेत भाग घेतात, त्यांच्या वयानुसार त्यांचे गट केले जातात. त्या गटानुसार त्यांची पशुवैद्य तपासणी करतात आणि त्यातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या बैलांची निवड पारितोषिकासाठी केली जाते. प्रत्येक गटाला प्रथम, व्दितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी बक्षिसं दिली गेली. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, आणि रोख रक्कम असंच बहुतांश बक्षिसांचं स्वरुप होतं.
घोटीचं जनावरांचं प्रदर्शन
घोटी हे विशेषत: जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण. दर शनिवारी घोटीला जनावरांचा मोठा बाजार भरतो आणि दर वर्षी एक मोठं जंगी प्रदर्शनही आयोजित केलं जातं. डांगी, खिल्लार किंवा संकरीत असा कोणत्याही प्रकारचा बैल किंवा गाय, म्हैस घोडा असं कोणतंही जनावर घ्यायचं असंल तर शेतकरी या घोटीच्या प्रदर्शनाला हमखास भेट देतात. कारण नाशिक बरोबरच आजुबाजूच्या जिल्ह्यांमधूनही चांगली आणि उत्कृष्ट जनावरं इथं विक्रीसाठी येतात. या वर्षीचं त्यांचं हे ४४ वं प्रदर्शन आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठं जनावरांचं प्रदर्शन म्हणुन या प्रदर्शनाला मान्यता मिळालेली आहे.
कोट्यवधींची झाली उलाढाल
दर वर्षी होणाऱ्या या प्रदर्शनातून कोट्यावधी रुपयांची उलाढालही होते. एकाच वेळी दोन-दोन बैलजोड्या घेणारे शेतकरीही या प्रदर्शनात असतात. या वर्षीच्या प्रदर्शनात जवळपास पाच कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली.
बैलांची किंमत दुपटीनं वाढते
'भारत4इंडिया.कॉम'ची ही टॉप ब्रीड स्पर्धा असो की घोटीत होणारं हे प्रदर्शन...यातून जो बैल बक्षिसासाठी पात्र ठरतो त्याची किंमत बाजारात दुपटीनं वाढते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. यंदाच्या या स्पर्धाही त्याला अपवाद नव्हत्या. नंबरात आलेल्या बैलांची किंमत चांगलीच वधारली होती. पण पशुधनाचं महत्व देखील यानिमित्तानं बिंबवलं जातं, त्यामुळं शक्यतो तशी नड असल्याशिवाय शेतकरी दावणीचा बैल बाजारात आणत नाही, हे आशादायक चित्रही यावेळी पहायला मिळालं.
Comments
- No comments found