टॉप न्यूज

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला !

ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून देशात ७ एप्रिलपासून १२ मेपर्यंत एकूण नऊ टप्प्यांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिल अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभेबरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत. मतमोजणी १६ मे रोजी होत असून त्यादिवशी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विविध घटकांचा विचार करून नऊ टप्प्यांत मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला असून आजपासूनच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झालीय, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Election

 

लोकसभा निवडणुकीचं धुमशान केव्हाच सुरू झालंय. सर्व पक्षांनी आपआपल्या पद्धतीनं प्रचाराची रणधुमाळी सुरू केलीय. त्यामुळं राजकीय पक्षांसह सर्वसामान्यांच्या नजरा निवडणुकीच्या तारखांकडं लागून राहिल्या होत्या. आज दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. संपथ यांनी ही निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रम्हा आणि मसिम झैदी यावेळी उपस्थित होते. जवळपास 35 दिवसांच्या काळात देशभर 28 राज्य आणि 7 केंद्रशासीत प्रदेशातील 543 लोकसभा जागांसाठी या निवडणूका घेण्यात येणार आहेत. विद्यमान लोकसभेचा कालावधी 1 जून 2014 ला संपणार असल्याने 31 मे पर्यंत नवे सभागृह अस्तित्वात येणार आहे. तसेच लोकसभेसोबतच आंध्रप्रदेश, ओरिसा आणि सिक्कीम या तीन राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रमांची घोषणाही यावेळी करण्यात आली.

 

देशभरात एकूण नऊ टप्प्यांत मतदान होणार आहे. तर, मतमोजणी 16 मे रोजी होणार आहे. लोकसभेसाठीच्या मतदानाबरोबरच आंध्र प्रदेश, ओरिसा आणि सिक्कीम या तीन राज्यांत विधानसभेसाठीदेखील मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 तीन टप्प्यांत मतदान होत आहे. एप्रिलमधील उन्हाचा कडाका विचारात घेऊन हे तीन टप्पे करण्यात आले असून 10 एप्रिलला विदर्भात, 17 एप्रिलला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात व 24 एप्रिलला मुंबई, उत्तर महाराष्ट्र व कोकण या भागात मतदान होणार आहे. विदर्भात चढत्या क्रमानं वाढणारा उष्णतेचा पारा विचारात घेता तिथं सर्वात प्रथम मतदान होत आहे.

 

राज्यात अशा होणार निवडणुका

टप्पा 1 – मतदान 10 एप्रिल

रिसोड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या 10मतदार संघात मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतीम तारीख 22 मार्च, उमेदवारी अर्ज पडताळणी 24 मार्चला असून उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा अंतीम तारीख 26 मार्च आहे.

 

टप्पा 2 - 17 एप्रिल 
हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले. या 19 मतदार संघात 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतीम तारीख 26 मार्च, उमेदवारी अर्ज पडताळणी 27 मार्चला असून उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा अंतीम तारीख 29 मार्च आहे.

 

टप्पा 3 - 24 एप्रिल  
नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि रायगड या १९ मतदार संघात 24 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतीम तारीख 5 एप्रिल, उमेदवारी अर्ज पडताळणी 7 एप्रिल असून उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा अंतीम तारीख 9 मार्च आहे.

 

रिसोड विधानसभा पोट निवडणूक 10 एप्रिलला
राज्यातील वाशिम जिल्हयातील रिसोड येथील आमदार आणि माजी मंत्री सुभाषराव झनक यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या रिसोड विधासभा पोट निवडणुकीची तारीखही आज जाही झाली. तिथं 10 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

 

16 व्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील ठळक वैfशिष्टये :

  • देशभरातील मतदान केंद्रांवर दिनांक 9 मार्च रोजी मतदारांना मतदान यादीतील आपले नाव तपासण्याची सुविधा उपलब्ध होणार.
  • यादीत नाव गहाळ असणार्‍या मतदाराला अर्ज ( फॉर्म क्र. 6) दाखल करून मतदान यादीमध्ये नाव दाखल करण्याची संधी दिली जाणार.
  • देशभर 9 लाख 30 हजार मतदान केंद्र (मागील निवडणुकीपेक्षा 12 टक्यांनी वाढ)
  • देशातील एकूण मतदार 81.4 कोटी (मागील निवडणुकीपेक्षा 10 कोटींनी वाढ)
  • या लोकसभा निवडणुकीत प्रथमच नोटा(नन ऑफ अब्हो) अर्थात वरील पैकी एकही नाही या पर्यायाचा उपयोग मतदाराला करता येणार आहे.
  • मतदारांना आपले नाव नेमके कोणत्या मतदार केंद्रात आहे व त्याचा यादीतील अनुक्रमांक कोणता आहे यासाठी थेट त्याच्या घरापर्यंत एक छायाचित्र मतदार पावती(फोटो व्होटर स्लीप) प्रथमच देण्यात येणार आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.