अवकाळी पावसानं आधीच कांद्याचं नुकसान झालंय. जवळपास 40-50 टक्के माल हा शेतातच खराब झाला होता. त्यातुन जो वाचलाय तो कांदा जास्त दिवस साठवण्याच्या योग्यतेचा नाही. म्हणुन शेतकरी सरळ बाजारपेठ गाठतायेत. पण गेले दोन जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याचा लिलावच बंद असल्यानं शेतकऱ्यांचा कांदा तिथेही पडुन आहे. आणि मार्केटमध्ये कांदा पावसात भिजण्याची भितीही आहे. तसं झालं तर शेतकऱ्यांच्या हातात मात्र काहीच उरणार नाही.
कामगारांची पगारवाढ
मार्केटमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांचा अर्धा पगार हा व्यापारी आणि अर्धा पगार बाजारसमिती देत असते. बाजारसमितीनं माथाडी कामगारांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला. पण व्यापाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला. अशी पगारवाढ होणार असेल तर आपण व्यवहार बंद करु अशी भुमिका त्यांनी घेतली. आणि पगारवाढीला व्यापाऱ्यांनी विरोध केला म्हणुन कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
कोट्यावधींची उलाढाल ठप्प
नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, सटाणा, नामपुर, मनमाड अशा नाशिकजिल्ह्यातल्या महत्वाच्या बाजारपेठा आहेत. या बाजारपेठांमध्ये आठवड्याला साधारणपणे 15-20 हजार क्विंटल कांद्याची आवक होते. आणि कोट्वधींची उलाढाल होते. म्हणजे दिवसाला सरासरी 3.5 हजार क्विंटल कांदा बाजारात येतो. गेले दोन दिवस लिलाव बंद असल्यानं जवळपास 7 हजार क्विंटल कांदा बाजारात आला नाही. रोज होणारी कोड्यावधींची उलाढालही ठप्प आहे. काही शेतकऱ्य़ांनी लिलाव बंद असल्याची माहीती मिळाल्यावर कांदा बाजारात आणलाच नाही. पण शेतकरी तो कांदा साठवुन ठेवु शकत नसल्यानं तो तसाही खराब होण्यचीच भीती आहे.
शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी
उन्हाळ कांद्याला यंदा चांगला भाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती. पण अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरवलं. 40-50 टक्के पीक शेतातच खराब झालं. याही परिस्थितीत खरीप हंगामात कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी तयारी केली पण अवकाळी पावसाचा फटका बियाण्यांनाही बसल्यामुळं बियाण्यांच्या किमतीत पाच ते सहा पटीनं वाढ झालीयं. तिथंही शेतकऱ्याला अडचणींनाच सोमोरं जावं लागतंय. अशा परिस्थितीत मोठ्या प्रयत्नांनी वाचविलेल्या आणि चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याचे दर वाढतील आणि त्यातून पुढील नियोजन करता येईल, अशी शेतकऱ्याला आशा होती, पण तीही आता मावळताना दिसतेय. गेली अनेक वर्ष माथाडी कामगारांचा हा लेव्हीचा प्रश्न सुटत नाहीये. पण त्याचा फटका मात्र फक्त शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतो. व्यापारी आणि माथाडी कामगाराच्या या वादानं नेहमीच शेतकऱ्यांना वेढला धरलं जातं. अवकाळी पावसापुन वाचवलेल्या कांद्याचा खरिपाच्या लागवडीसाठी उपयोग असं शेतकऱ्यांना वाटलं होतं पण लेव्ही प्रश्न चिघळला तर मात्र या शेतकऱ्यांची खरिपाची आशाही मावळेल. त्यामुळं प्रशासनानं आता हा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करतायेत.
Comments
- No comments found