वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक
2014 ची ही विधानसभा निवडणूक अनेक अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण होती. सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं ते हे की सर्व प्रमुख पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली आणि आपली ताकद आजमावली. त्यामुळं इतके दिवस एकमेकांसोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांना एकमेकांच्या विरोधात काम करावं लागलं. एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन इतके दिवस काम केल्यानंतर या निवडणूकीत मात्र एकमेकांचे उणे-दुणे काढत प्रचाराची अगदी खघालची पातळी सर्वांनीच गाठली होती.
दिग्गजांना धक्का
लोकसभा निवडणूकीत काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तीच परिस्थीती महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीतही झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना जनतेनं खाली खेचलंय, त्यांचं नेतृत्व नाकारलंय. त्यात नारायण राणे, राजेंद्र दर्डा, हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, कृपाशंकर सिंह, बाळा नांदगावकर, सतेज पाटील अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे. आणि विषेश म्हणजे आघाडी सरकारमध्ये असलेल्या जवळपास डझनभर मंत्र्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय.
राणेंच्या गडाला भगदाड
कोकण किंवा कुडाळ म्हणजे नारायण राणे असं समिकरण एके काळी होतं. याही वेळेला ते तसंच राहील असंच वाटत होतं पण कुडाळमध्येही इतिहास घडला, शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी जवळपास 10 हजार नारायण राणेंचा पराभव केला. एकीकडे नारायण राणेंचा पराभव झाला, तर दुसरीकडे त्यांचा मुलगा नितेश राणे यांचा कणकवलीत विजय झाला. यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त कराताना राणे म्हणाले ही हा माझ्या राजकीय कारकीरर्दीचा अस्त तर नितेशच्या कारकिर्दीचा उदय आहे. त्यामुळं एकीकडे मुलाच्या विजयाचा आनंद आणि दुसरीकडे वडीलांच्या पराभवाचं दु:ख असं संमिश्र चित्र कोकणात निर्माण झालंय.
मनसेचं पानिपत
महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्लू-प्रिंटसह महाराष्ट्राच्या जनतेनं मनसेला नाकारल्याचं चित्र आहे. 2009 च्या निवडणूकीत महाराष्ट्राच्या जनतेनं राज ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसेच्या जवळपास 13 जागा निवडून दिलेल्या होत्या, त्यानंतर नाशिक महानगरपालिकेची सत्ताही दिली. पण सर्वच ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी जनतेची निराशा केली. या विधानसभा निवडणूकीत मनसेनं महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट आणली, त्या ब्लू-प्रिंटसह महाराष्ट्राच्य जनतेनं मनसेला पुर्णपणे नाकारलंय. मनसेला या विधानसभेत केवळ एकच जागा जिंकता आलीये.
एमआयएमचा प्रवेश
निवडणूक सुरु झाल्यापासुन निकाल लागेपर्यंत कोणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या एमआयएमनं महाराष्ट्राच्या राजकारणार प्रवेश केलाय. आणि नुसता प्रवेशच नाही तर दोन उमेदवारही निवडून आणलेत. औरंगाबाद आणि मुंबईच्या भायखळा मतदार संघातून एमआयएम चे उमेदवार निवडून आलेत. एमआयएमच्या लढतीचा सर्वात मोठा फटका बसला तो काँग्रेसला. काँग्रेसच्या वोटबँकमध्येच भगदाड पडल्यानं काँग्रेसला त्याचा फटका बसलाय. एमआयएमचा महाराष्ट्राच्या राजकारणातला हा प्रवेश महाराष्ट्रासाठी चांगला की धोक्याची घंटा हे येणारा काळच ठरवेल.
मोदी लाट?
लोकसभा निवडणूकीवर फक्त मोदींचा प्रभाव होता, एक प्रचंड लाट होती, विधानसभेतही ती असेल अशी अनेकांची अपेक्षा होती. पण या निवडणूकीत ती ओसरल्यासारखी दिसली. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात 20 पेक्षा जास्त सभा घेतल्या पण तरीही पुर्ण बहुमत मात्र मिळवता आलं नाही, त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेला सत्तांतर हवं होतं, म्हणून त्याचा फायदा भाजपला झाला असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मुंडे कन्यांचं यश
परळी मतदार संघातून आपल्या चुलतभावाचा पराभव करत पंकजा मुंडे पुन्हा एकदा विधानसभेत दाखल झाल्यात तर भाजपचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीचाही निकाल लागला. यात मुंडेंची कन्या प्रितम मुंडे यांना जनतेनं गोपिनाथ मुंडेंच्या जागेवर निवडून दिलंय. दोन्ही मुंडे कन्यांना निवडून देऊन जनतेनं खऱ्या अर्थानं आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहील्याचं चित्रं निर्माण झालंय.
सरकार कोणाचं
भाजपला सर्वाधिक जागा जिंकता आल्या तरीही त्यांना पुर्ण बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळं सरकार स्थापन करायला त्यांना कोणाची ना कोणाची मदत घ्यावीच लागणार आहे. भाजपसमोर सर्वच पर्याय खुले असल्याचं वरिष्ठांकडून सांगण्यात आलंय. त्यातच निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीनं भाजपला बाहेरुन पाठींबा जाहीर करत त्यांची भुमिका स्पष्ट केलीये. तर महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करणाऱ्या आणि अखंड महाराष्ट्राचा विकास करणाऱ्या पक्षासोबत आपण जाऊ अशी भुमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलीय. त्यामुळं प्रचारात अगदी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका केलेल्या राष्ट्रवादी बरोबर जायचं की जुनी मैत्री पुढे कायम ठेवायची याचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
Comments
- No comments found