टॉप न्यूज

बालवीरांना शौर्य पुरस्कार

ब्युरो रिपोर्ट
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी अतुलनीय साहसी काम करणाऱ्या बालकांना त्यांच्या साहसाकरिता 'राष्ट्रीय शौर्य पुरस्कार' देऊन गौरवण्यात येतं. यंदाच्या या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील हाली रघुनाथ बरफ आणि समीप अनिल पंडित या दोन बालवीरांची निवड करण्यात आलीय. यंदाचा हा पुरस्कार प्रथमच मरणोत्तर दिला जाणार असल्यानं या पुरस्काराचं महत्त्व वाढलंय.

National Bravery Awardsभारतीय बालकल्याण परिषदेनं शुक्रवारी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2012च्या विजेत्यांची घोषणा केली. या पुरस्कारासाठी एकूण 22 बालवीरांची निवड करण्यात आलीय. यात 18 मुलं तर 4 मुलींचा समावेश आहे. निवड झालेल्या मुला-मुलींना राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे.

मिझोरामच्या दिवंगत रामदिन थाराला त्याच्या अतुलनीय साहसासाठी हा पुरस्कार मरणोत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. रामदिन थारानं 15-20 फूट खोल पाण्यामध्ये बुडणाऱ्या काही मुलांचा जीव वाचवला. परंतु त्यांना वाचवत असताना त्याला स्वतःचे प्राण द्यावे लागले होते.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते या बालवीरांना पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराचं स्वरूप पदक, प्रमाणपत्र, आणि रोख रक्कम असं आहे. तसंच योग्यतेनुसार यातील काही मुलांना त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत सरकारकडून अर्थसहाय्यही करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये दिला जातो. महाराष्ट्रातील कुमार हाली रघुनाथ बरफ याला 'बापू गायधनी' पुरस्कारनं सन्मानित केलं जाणार आहे, तर समीप अनिल पंडित याला 'वीरता पुरस्कार' दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त विविध राज्यांतील बालवीरांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

यामध्ये भारत पुरस्काराकरता गुजरातच्या 17 वर्षांच्या तरंग मिस्त्रीची निवड करण्यात आलीय. छत्तीसगडच्या 10 वर्षीय गजेंद्र राम याला संजय चोपडा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. उत्तर प्रदेशच्या विजय कुमार सैनी (वय15), छत्तीसगडची आकांक्षा गौते (वय16) यांना बापू ज्ञाधानी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. याशिवाय छत्तीसगडचा देवांश तिवारी (वय8), मुकेश निषाद (वय16), मिजोरमचा ललरनहुआ (वय12), तमिळनाडूमधील से. ई. सुगंधन (12), केरळमधील के. रमिथ के. (वय14), मेबिन साइरियाक (वय16) आणि विष्णू एम. व्ही. (वय17), उत्तर प्रदेशातील विश्वेंद्र लोखना (वय15), सतेंद्र लोखना आणि पवन कुमार कनौजिया (वय12), मेघालयातील स्ट्रिपलीजमेन मिलियम (वय9), राजस्थानातील सपना कुमारी मीणा (वय14) आणि कर्नाटकातील सुहैल के. एम. (वय13) या बालवीरांचा समावेश करण्यात आला आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.