टॉप न्यूज

70 हजार कोटी गेले कुठं?

विवेक राजूरकर, जालना
मी मतं मागायला आलो नाही, तर मत मांडायला आलो आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात झंझावाती दौरा सुरू केलाय. कोल्हापूर, खेड, सोलापूरप्रमाणं काल (शनिवार) जालना शहरातही त्यांची जाहीर सभा झाली. त्‍यावेळी त्यांनी टीकेला चोख प्रत्‍युत्तर देऊन हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं खुलं आव्हानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं. सिंचनाच्या प्रश्नालाही त्यांनी पुरता हात घातला असून सिंचनावर खर्च झालेले 70 हजार कोटी गेले कुठं, असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला.
 

अधोगतीला राष्ट्रवादीच जास्त जबाबदार 
गेली अनेक वर्षं यांच्या हातात सत्ता आहे, पैसा आहे. इतक्या वर्षांत तुम्‍ही महाराष्‍ट्राला काय दिलं? असा प्रश्न करून राज्याच्या अधोगतीला राष्ट्रवादीच जास्त जबाबदार आहे, असा आरोप राज यांनी केला. राज्याच्या विकासासाठी पाणी, वीज, रस्ते, तसंच कायदा आणि सुव्यवस्था ही खाती महत्त्वाची असतात. ती सलग 14 वर्षांपासून राष्ट्रवादीकडं आहेत. मात्र, त्यांनी विकास न करता सत्तेचा वापर फक्त स्वतःची खळगी भरण्यासाठीच केला, असंही राज म्हणाले. मी बावचळलोय असं, म्हणणारे अजित पवार हे मी केलेल्या चार जिल्ह्यांच्या दौऱ्यामुळं एवढे त्रस्त आहेत. मी राज्यातील साडेतीनशे तालुक्यांचा दौरा करायला सुरुवात केल्यावर त्यांची काय अवस्था होईल. मला काळे झेंडे दाखवताय, पण या काळ्या झेंड्याचं रूपांतर लाल बावट्यात होण्यास वेळ लागणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला.


RAJ Thackerayमनसेला बदनाम करण्यासाठी बनावट केसेस
अजित पवार यांच्यावर पुन्हा हल्ला चढवत त्यांनी दादागिरी खपवून घेणार नाही, असंही ठणकावलं. जशास तसं उत्तर द्यायचं असेल तर गुजरातला द्या, कर्नाटकला द्या, गोव्याला द्या, तसा विकास करा आणि असं घडलं तर मी स्‍वतः हार घालून तुमचा सत्‍कार करीन. जशास तसं उत्तर द्यायचंच आहे तर मुंबईच्या आझाद मैदानात दंगल करणाऱ्यांना का नाही दिलं, असा प्रश्नही त्यांनी केला? मनसेला बदनाम करण्यासाठी पोलीस कार्यकर्त्यांवर बनावट केसेस उभ्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण लोकांनी घाबरण्याची गरज नाही. सत्ता आल्यानंतर त्या सर्व केसेस काढून घेईन, अशा शब्दात त्यांनी सत्तेवर मिळवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.


कृषिमंत्री शरद पवारांसाठी प्रश्‍न
राज यांनी आपल्याला पोरकट म्हणणाऱ्या कृषिमंत्री शरद पवार यांना काही प्रश्‍न विचारले. महाराष्‍ट्रात 30 वर्षांपासून अनेक प्रकल्‍प रखडले आहेत. हजारो कोटींचा पैसा वाया गेलाय. प्रकल्‍पांच्‍या‍ किमती अनेक पटीनं वाढतच आहेत, असं का? दुष्काळ आहे म्हणून लग्नावर उधळपट्टी करणाऱ्या नेत्यांना खडसावण्याचा आव आणणारे शरद पवार हे महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल मॅचेस थांबवणार आहेत का? असे प्रश्नही केले. आम्ही आमच्या पैशांनी पंचतारांकित हॉटेलात राहतो. मात्र सरकारचा म्हणजे जनतेचाच पैसा वापरून हेलिकॉप्टरमध्ये दौरे काढणाऱ्या मंत्र्यांचे हिशेब काढू का, असंही त्यांनी ठणकावलं.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.