टॉप न्यूज

ब्युरो रिपोर्ट, सातारा
दुष्काळ असताना आपल्याच सहकाऱ्यांकडून दणक्यात साजरे झालेले विवाह, वाढदिवस पाहून झोप उडालेल्या शरद पवारांनी जाहीरपणे कानउघाडणी केली होती. त्यानंतर आता त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागलाय. शरद पवारांनी नुकत्याच केलेल्या सातारा दौऱ्यात स्थानिक नेतेमंडळींनी कार्यक्रम तर साधेपणानं साजरा केलाच. शिवाय वाचवलेल्या खर्चातून चारा खरेदी करून तो दुष्काळग्रस्त भागात पाठवून दिला. थोडाथोडका नव्हे चक्क 200 ट्रक चारा यामुळं दुष्काळासाठी मिळाला. विशेष म्हणजे, त्यात खासदार उदयनराजे भोसले हेदेखील आघाडीवर होते. सर्वच नेत्यांनी हा धडा गिरवला तर दुष्काळग्रस्तांची तहान भागायला कितीसं पाणी लागणारंय बाप्पा!
 
ब्युरो रिपोर्ट, सातारा
दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्यानं सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालंय. मोठ्या मेहनतीनं जगवलेल्या फळबागा जळून गेल्यात. तर काही ठिकाणी शेतकरी जीवाचा आटापिटा करून फळबागा जगवतोय. त्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं पुढाकार घेतलाय. फळबागांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 45 हजारांचं पॅकेज प्रस्तावित करण्यात आलंय. त्यातून जास्तीत जास्त 90 हजारांची नुकसानभरपाई मिळण्याची आशा निर्माण झालीय. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीच ही माहिती दिली असून येत्या दहा दिवसांत त्याबाबत घोषणा होऊ शकते.
 
ब्युरो रिपोर्ट, सोलापूर
सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळं महाराष्ट्रावर दुष्काळ कोसळला आहे. दुष्काळ आणि विकासाच्या अभावामुळं खेड्यांमधून लोकांचे तांडेच्या तांडे बाहेर शहराकडं पडत आहेत. दुष्काळाचं नियोजन का केलं नाही? सिंचनाचे 70 हजार कोटी गेले कुठं? असे सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरच्या नॉर्थकोट मैदानावरील जाहीर सभेत केले. या सभेला प्रचंड तरुणाई लोटली होती.
 
मुश्ताक खान, रत्नागिरी
आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन केवळ वाचनानंच मिळू शकतो, असं सांगत तुम्ही जीवनात कितीही व्यस्त असलात तरी पुस्तक वाचायला वेळ काढलाच पाहिजे, असा सल्ला दिलाय कवी इंद्रजीत भालेराव यांनी. मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात आता राजकारण सुरू झालंय, हा सगळा खटाटोप मराठी भाषेच्या विकासासाठी नाही, तर ३०० कोटींच्या निधीसाठी सुरू असल्याची टीकाही भालेराव यांनी केलीय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबर्इ/सातारा/परळी
डिसेंबरपर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याच्या घोषणा हवेतच विरल्यात. याउलट दाभोळ ऊर्जा प्रकल्प आणि परळीचा औष्णिक वीज प्रकल्प ठप्प झाल्यानं राज्यात सध्या तीन हजार मेगावॅट एवढ्या विजेचा तुटवडा आहे. मार्चपर्यंत भारनियमन न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. परंतु, ग्रामीण भागातील बत्ती आतापासून गुल व्हायला लागलीय. उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्यावर मागणी आणि तूट वाढत गेल्यास भारनियमन अटळ होणार आहे. वीज हवी असेल तर जादा पैसे मोजण्याची तयारी ठेवा, असं सरकारच सांगू लागलं तर आम्ही पाहायचं तरी कुणाच्या तोंडाकडं, असा सवाल दुष्काळग्रस्त जनता विचारतेय.
 
ब्युरो रिपोर्ट, हैदराबाद
हैदराबादच्या दिलसुखनगर इथं गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 14 झालीय. तर जखमींची संख्याही 119वर गेल्याचं समजतंय.  गुरुवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हैदराबाद शहर साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं. सायंकाळी सातच्या सुमारास एकापाठोपाठ असे दोन स्फोट झाले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्यामागं ' इंडियन मुजाहिदीन 'चा हात असल्याचा संशय आहे.  तसंच बॉम्बमध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
 
यशवंत यादव, सोलापूर
आज माघी एकादशी. चंद्रभागेकाठी भाविकांची दाटी झालीय. माघी वारीनिमित्त राज्यभरातून तसंच कर्नाटक, आंध्र प्रदेशातून जवळजवळ अडीच लाख भाविक पंढरीत दाखल झालेत. प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, चंद्रभागेचं वाळवंट भाविकांनी फुलून गेलंय. जिकडं पाहावं तिकडं भाविकांची गर्दी दिसतेय. विठ्ठलाची पददर्शन रांग गोपाळपूरपर्यंत गेलीय. पददर्शनासाठी 8-10 तास लागत आहेत. श्रीविठ्ठलाच्या पददर्शन रांगेत एक लाखाहून अधिक भाविक उभे आहेत. विठोबाच्या चरणी माथा टेकताना बा...विठ्ठला दुष्काळाचा वेताळ हटू दे, अशीच मागणी वारकरी करतायत.
 
ब्युरो रिपोर्ट, पुणे
ग्रामीण जनतेला आपल्या गावात सर्व सरकारी कामकाजांची कागदोपत्री पूर्तता करता यावी, या उद्देशानं राज्य महसूल विभागातर्फे आयोजित 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम नुकताच आंबेगाव तालुक्यात पार पडला. यावेळी तब्बल २६ हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला. आंबेगावच्या नवीन तहसील कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त हा कार्यक्रम झाला.
 
ब्युरो रिपोर्ट, सातारा
राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असून परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे.  केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केद्र सरकारनं दुष्काळासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या निकषात बदल करावेत, अशी मागणीही आपण करणार आहोत. याशिवाय कर्नाटक सरकारबरोबर पाण्याची देवघेव करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 
शशिकांत कोरे, सातारा
इंटरनेटमुळं जग अधिकच जवळ आलंय. त्यामुळं युवकांना करिअरसाठी जगभरासाठीची बाजारपेठ खुणावतेय. त्यामुळंच परदेशी भाषा शिकण्यासाठी तरुण पिढी रस घेऊ लागलीय. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतच नव्हे, तर आता छोट्या शहरांतही परदेशी भाषा शिकवणारे वर्ग जोरात सुरू आहेत. साताराही त्याला अपवाद नाही. इथल्या लिग्विस्ट अॅकॅडमी या संस्थेत परदेशी भाषा शिकण्यासाठी तरुणाई गर्दी करतेय. अलीकडंच जपान फाऊंडेशननं घेतलेल्या जपानी गाण्याच्या स्पर्धेत या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकावून मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकावलाय.