टॉप न्यूज

'इंडिया ग्रेप हार्वेस्ट' विंचूरमध्ये

ब्युरो रिपोर्ट, नाशिक
नाशिक हा भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष लागवड करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो.  वायनरीजमुळं 'वाईन सिटी' म्हणून पुढे येणारं नाशिक शहर पर्यटकांना चांगलंच आकर्षित करतंय. वाईन टुरिझमसाठी तर नाशिक हॉट-स्पॉटच आहे. आपली हीच ओळख टिकवून ठेवण्यासाठी नाशिकमधील विंचूर वाईन यार्डला १४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०१४ दरम्यान ‘इंडिया ग्रेप हार्वेस्ट 2014’ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. भारताचे कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ तसंच खासदार समीर भूजबळ यांच्या उपस्थितीत त्याचं औपचारिक उद्घाटन नाशिकमधील हॉटेल एमराल्ड पार्क इथं पार पडलं.  
 

 

 उद्घाटनपर भाषणात कृषी मंत्री शरद पवार म्हणाले की, "विदेशात अशा प्रकारचे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. स्पेनमध्ये जसा टोमॅटीना फेस्टिव्हल साजरा केला जातो. त्याला अल्पकाळातच जागतिक दर्जा प्राप्त झालाय. इंडिया ग्रेप हार्वेस्ट या फेस्टीव्हललाही आपण जागतिक दर्जा प्राप्त करुन द्यायला हवा. वाईन हे एक उपयुक्त पेय आहे. चाळीस वर्षापूर्वी बारामतीमध्ये पहिल्या वाईनरीची मी सुरवात केली. वाईन उद्योगामुळं द्राक्षांची लागवड वाढली आहे आणि याचा शेतक्र्‍यांना चांगला फायदा झाला आहे. फेब्रुवारीमध्ये होणार्‍या 'इंडिया ग्रेप हार्वेस्ट 2014' या कार्यक्रमाला आमचे संपूर्ण सहकार्य असेल. ‘इंडिया ग्रेप हार्वेस्ट 2014’ यशस्वी करुन आपली वाईन आपण जगभरात पोहचवू.

 

  

wine-13 'इंडिया ग्रेप हार्वेस्ट 2014'ची वैशिष्ट्ये:

- वाईन ही दारू नसून ती आरोग्यादायी पेय आहे याबाबत लोकांमध्ये जागृती करणं तसंच त्याचं महत्व पटवून देणं
- एकाच छताखाली 30 लहान मोठ्या वाईन उत्पादकांचा समावेश
- वाईन पर्यटनाला चालना देणं
- द्राक्षाच्या बाय प्रॅाडक्टला मार्केट उपलब्ध करणं

 

“वाईन आणि पर्यटन हे खूप चांगलं मॉडेल असून नाशिकमध्ये त्याच्या विस्ताराला मोठा वाव आहे. आम्ही देखील या दिशेनं काम करत आहोत. त्यामुळं या कार्यक्रमाला आमचं प्रोत्साहन राहणार आहे” असं पर्यटन मंत्री छगन भूजबळ यांनी सांगितलं.
अखिल भारतीय द्राक्ष उत्पाद्क बोर्डाचे अध्यक्ष जगदिश होळकर यांनी हा व्यवसाय गेल्या काही वर्षात अडचणीत आल्याचं सांगून बिनव्याजी कर्ज अथवा कर्जामध्ये सवलती द्याव्यात अशी यावेळी मागणी केली.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.