टॉप न्यूज

आर्वीत रंगली कबड्डी...

ब्युरो रिपोर्ट

वर्धा - सध्याच्या क्रिकेटच्या युगात देशी खेळ मागं पडत चाललेत याची खंत सर्वच जण व्यक्त करतात. पण प्रत्यक्षात करत काहीच नाहीत. वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीत मात्र गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या जल्लोषात कबड्डी स्पर्धा पार पडतात. यावेळी ३० आणि ३१ डिसेंबरला या स्पर्धा पार पडल्या. देशी खेळांमध्येही किती जल्लोष असतो आणि त्यासुद्धा कशा एन्जॉय करता येतात, याचं अनोखं दर्शन यावेळी पाहायला मिळालं. अवघी आर्वी नगरी यानिमित्तानं कबड्डीमय होऊन गेली होती.

पोलीस संघांची बाजी 

या स्पर्धेत नागपूर सीटी रेंज पोलीस संघानं पुरुष गटात तर शहर महिला पोलीस संघानं महिला गटात बाजी मारली. 

दिवंगत आमदार डॉ.  शरद काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जागृती सोशल फोरमतर्फे दरवर्षी विदर्भस्तरीय महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं.  आर्वीच्या भारतरत्न राजीव गांधी मैदानावर दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विदर्भातील तब्बल 12 महिला संघ आणि 20 पुरुष संघांनी सहभाग घेतला होता.  पुरुष गटातील अंतिम सामना नागपूर रेंज पोलीस संघाविरुध्द नागपूरच्या एकलव्य क्रीडा मंडळात रंगला होता. यात नागपूर रेंज पोलीस संघानं बाजी मारत विजेतेपद पटकावलं,  तर महिला गटातील अंतिम सामन्यात नागपूर शहर महिला पोलीस संघानं नागपूर रेंज पोलीस संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावलं.  विजेत्या संघाला प्रत्येकी 25 हजारांचा पुरस्कार आणि स्मृतिचषक देण्यात आला.   समारोप कार्यक्रमाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे आणि माजी आमदार अमर काळे उपस्थित होते. 

क्रिकेटच्या या युगात देशी खेळांना आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे.  या स्पर्धेतून अनेक खेळाडू राज्य आणि देशपातळीवर चमकले आहेत.  क्रिकेटच्या झगमगाटात देशी खेळ नामशेष होत चालले आहेत.  अशा स्पर्धांमुळं देशी खेळांना चालना मिळेल आणि नवे खेळाडू पुढं येतील. याच उद्देशानं या स्पर्धा घेण्यात येत असल्याचं आयोजक माजी आमदार अमर काळे यांनी सांगितलं. 

अविनाश गोहाड,  राजेंद्र रत्नपारखी,  छोटू शर्मा, गजेंद्र वाघ, देवी कांबळी, अंकुश भीमके, रजत रामटेके, मामू केणे, यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.