टॉप न्यूज

हापूस इलो रेsss इलो...!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
कोकणच्या राजानं आता झिम्मा घालायला सुरवात केलीय. यंदाच्या हंगामातील पहिलाच हापूस थेट देवगडवरुन एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालाय. दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच हापूस बाजारात आलाय. आज तब्बल ३०० पेट्यांची आवक झ़ाली असून ७०० ते १५०० रुपये प्रति किलो दरानं आंबा विकला जातोय. हवामान पोषक राहिल्यानं यंदा चांगल्या दर्जाचा भरघोस हापूस हाताशी लागणार आहे. त्यामुळं किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.  
 

 

 हापूस म्हणजे कोकण

''आंबा पिकतो, रस गळतो
कोकणचा राजा बाई, झिम्मा खेळतो''

हापूस ही कोकणची ओळख आहे. कोकणातील लाल मातीत पिकणाऱ्या हापूसला जगात तोड नाही. त्यामुळं आता इंग्लंड, अमेरिकेतील नागरिकांनाही त्याची भुरळ पडू लागलीय. कोकणातल्या देवगड, वेंगुर्ला, मालवण, राजापूर, रत्नागिरी इथून हापूस बाजारात येतो. या ठिकाणी हापूसची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. इथं पिकणाऱ्या हापूसची सर इतर कुठंही पिकणाऱ्या हापूसला येत नाही. त्यामुळंच अलिकडं हापूसला आंतराष्ट्रीय बाजारातही मागणी वाढू लागल्यानं निर्यातही मोठ्या प्रमाणात होते. साहजिकचं त्यायोगे कोकणात पैसाही खुळखुळू लागलाय...

 

Mango3 किंमती सर्वसामान्यांच्या आटोक्यात राहणार
पोषक हवामान लाभल्यामुळं यंदा कोकणात हापूस आंब्याचं एकुणंच पीक चांगलं आलंय. त्यामुळं साहजिकचं किमती आवाक्यात राहतील आणि मुंबईकरांसह सर्वसामान्य मऱ्हाटी माणसांना हापूस चाखायला मिळेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. यंदा एक महिना आधी सिझन सुरु झालाय, तो भरात येईल त्यावेळी म्हणजे एप्रिल, मेमध्ये मुबलक प्रमाणात हापूस बाजारात येईल. नेहमीप्रमाणं यंदा सिझनच्या अगोदर आलेल्या हापूसच्या किंमती जास्त आहेत. त्याची प्रतवारीदेखील उत्तम आहे. हापूस आल्याचं समजल्यानं आता हौशी लोकांकडून मागणी येऊ लागलीय, अशी माहिती आंबा व्यापारी उल्हास नवले यांनी 'भारत४इंडिया.कॉम'शी बोलताना दिली. यंदाचा पहिला हापूस नवले यांच्याकडंच आलाय त्यामुळं मुंबैकरांचे तोंड हापूसनं तोडं करण्याचा पहिला मानही उल्हास नवले यांनाच मिळतोय.

 


mango2सिझन जास्त दिवस चालणार
खरंतर, उन्हाळा हा हापूसचा सिझन समजला जातो. उन्हाळा असह्य व्हायला लागला की जागोजागी रसरशीत हापूस दिसायला लागतो. साधरणत: मार्चपासून सुरू झालेली आवक शेवटच्या आठवड्यापासून वाढू लागते. मेमध्ये ती सर्वाधिक असते. अगदी मृगाची धार पडेपर्यंत मागणी तशीच टिकून राहते. त्यानंतरही आवक येत राहते, मात्र त्याला तेवढी मागणी नसते. यंदा जरा लवकरच फेब्रुवारीतच हापूस बाजाराज आल्यानं सिझनचा कालावधी वाढेल. म्हणजे जून संपेपर्यंत तरी चांगला, दर्जेदार हापूस चाखायला मिळेल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2013 मध्ये वाशी एपीएमसी मार्केटमधून सर्व प्रकारच्या हापूसची जवळपास 300 कोटींची उलाढल झाली होती. आंब्याचा सिझन एक महिन्यानं वाढल्यामुळं या वर्षी ही उलाढालही आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

असं आहे वाशीचं फळ मार्केट
वाशीच्या एपीएमसी मार्केटला जवळपास 150 वर्षांचा इतिहास आहे. इथला फळबाजार हा देशातलं एक महत्त्वाचं आणि सर्वात मोठं टर्मिनल फ्रूट मार्केट म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रासह देशभरातून आणि परदेशातलीही विविध प्रकारची, वेगवेगळ्या जातींची फळं या बाजारात उपलब्ध असतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवगड-रत्नागिरीचे हापूस आंबे, गुजरातचे आंबे, कर्नाटकचे आंबे, काश्मीरची लिची, काश्मीरची सफरचंदं, जपानची संत्री, भारतातली मोसंबी, चायनीज सफरचंदं अशी वेगवेगळी फळं सीझनप्रमाणं मुबलक प्रमाणात, घाऊक दरात इथं उपलब्ध असतात. हापूसचा सिझन हा इथला खास धामधुमीचा सिझन असतो. कोकणातील हापूसचा सिझन संपला की गुजरातमधील आंब्यांचा सिझन सुरू होतो. यावेळीही गुजरातच्या हापूस, केशर अशा आंब्यांचीही मोठी आवक या बाजारात होते. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत या फळबाजाराचा मोठा हातभार आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.