टॉप न्यूज

'भारत4इंडिया' बनलं बळीराजाचं माध्यम

अविनाश पवार

पुणे - पुण्याजवळच्या मोशीमध्ये किसान प्रदर्शनाच्या निमित्तानं भरलेल्या शेतकऱ्यांच्या जत्रेची काल रविवारी सांगता झाली. गेल्या पाच दिवसांत देशभरातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यामध्ये अर्थातच मराठमोळ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. इथून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून शेतीचं उत्पादन वाढवण्याचा संकल्प करीत अनेक शेतकरी परतलेत.

त्यामुळं इथून पुढं खेड्यापाड्यात शेतीत नवनवीन प्रयोगांची नांदी होईल, असा विश्वास आयोजक निरंजन देशपांडे यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केला. महत्त्वाचं म्हणजे 'भारत4इंडिया' खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं माध्यम बनल्याचं स्पष्ट झालं.

12-12-12 रोजी सुरू झालेले हे प्रदर्शन रविवार ता. 16 रोजी संपलं. 1993 पासून भरवल्या जाणाऱ्या या प्रदर्शनाला प्रतिवर्षी शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढतोच आहे. यावेळचं हे 20वं प्रदर्शनही त्याला अपवाद नव्हतं.

प्रदर्शनात एकूण साडेतीनशे स्टॉल्स होते. यात शेती उपयोगी लहानात लहान वस्तूंपासून ते मोठ्या अवजड यंत्रांपर्यंत सर्व प्रकारच्या आधुनिक यंत्रांचा समावेश होता. यामुळं वस्तूंबरोबरच त्याची उपयुक्तता तसंच किंमत, खरेदीच्या योजना यांची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. शेतीला जोडधंदा म्हणून करता येण्यासारख्या व्यवसायांची माहिती देणारे देखील अनेक स्टॉल्स होते. महाराष्ट्र शासन आणि पणन महामंडळाच्यावतीनं शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. तसंच व्हीएनआर जातीच्या गोड आणि सीडलेस पेरूचा स्टॉल वैशिष्ट्यपूर्ण होता. कारण या पेरूची लागवड कोणत्याही भौगोलिक वातावरणात करता येऊ शकते. तसंच कमी पाण्यात या पेरूचं अधिक उत्पादन घेता येऊ शकतं. शिवाय हा पेरू अधिक काळ टिकू शकत असल्यानं बाजारात त्याचे अधिक पैसे शेतकऱ्याला मिळू शकतात. ग्राहकांनाही हा पेरू कमी बियांचा आणि गोड असल्यानं आवडतोच. ह्या स्टॉलवरच या पेरूची मोठ्या प्रमाणात विक्रीदेखील झाली.

या प्रदर्शनाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथं  केवळ देशातलीच नव्हे तर देशाबाहेरूनही अनेक शेतीच्या अवजारांचे उत्पादक सहभागी झाले होते. याही वर्षी हायटेक शेतीविषयक माहिती सांगणारे स्टॉल्स दिसून आले. उदा. टिश्यू कल्चर तंत्रज्ञान, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट, ड्रीप-स्प्रिंकलर इरिगेशन, जैवतंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापन, सौर ऊर्जा अशा अनेक प्रकारची परिपूर्ण उत्पादनं या किसान प्रदर्शनात शेतकऱ्यांना जवळून पाहता आली. अनेक शेतकऱ्यांनी शेती उपयोगी अवजारं खरेदीदेखील केली. त्यातून कोट्यवधींची उलाढाल झाली.

या वर्षी देशभरात नैसर्गिक संकट असतानाही या प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं किसान प्रदर्शनाचे आयोजक निरंजन देशपांडे यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं. प्रदर्शनात शेतकऱ्यांची नजर पाण्याच्या समस्येवर मात करणाऱ्या आणि कमीत कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याकरता आवश्यक असणाऱ्या ठिंबक सिंचनाच्या उत्पादनावर होती. येत्या काळात त्याबाबतची अधिकाधिक माहिती देण्याचा मनोदयही देशपांडे यांनी बोलून दाखवला.


Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.