टॉप न्यूज

पत्रकारांचं कर्दनकाळ वर्ष

विनोद राऊत

'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करून आजचा पत्रकार दिन साजरा करूया. पत्रकारांचं समाजातलं महत्त्व, त्यांची कर्तव्यं, जबाबदारी या सर्व गोष्टींचं भान पत्रकाराला ठेवावं लागतं. कधी कधी वार्तांकन जीवावरही बेततं. विविध घडामोडींचं वार्तांकन करणाऱ्या अनेक पत्रकारांसाठी 2012 हे वर्ष कर्दनकाळच ठरलं. त्यावरचाच हा एक रिपोर्ट...

2012 या वर्षात जगभरात अनेक घडामोडी घडल्यात. अमेरिकन निवडणुका, मध्यपूर्वेतील अनेक देशांमधला उठाव, सीरियातलं गृहयुध्द, चीनमधलं सत्तांतर या गेल्या वर्षातल्या प्रमुख घटना. मात्र या सर्व घडामोडींचं वार्तांकन करणाऱ्या अनेक पत्रकारांसाठी हे वर्ष कर्दनकाळच ठरलं. कर्तव्य बजावत असताना जवळपास जगभरातले 141 पत्रकार, वृत्तपत्र कर्मचारी, नेटिझन्सना आपला जीव गमवावा लागला. तर विविध देशांमध्ये 879 पत्रकारांना जेलमध्ये डांबण्यात आलं.  इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट  आणि रिपोर्टर विदाऊट बॉर्डर या मीडियात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी ही आकडेवारी जमा केलीय.

मृत्यूच्या संख्येत वाढ

या वर्षी पत्रकारांच्या मृत्यूंमध्ये वाढ होण्याचं मुख्य कारण म्हणजे सीरियातलं गृहयुध्द. पाकिस्तान आणि सोमालियातला धार्मिक हिंसाचार. एकूण मृत्युमुखी पडलेल्या 144 पत्रकारांमध्ये, 88 वृत्तपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांत काम करणारे पत्रकार, 47 नेटिझन्स तर सहा मीडिया सहाय्यकांचा समावेश आहे.
जगभरात सातत्यानं सत्ताधाऱ्यांविरुध्द आवाज उठवणाऱ्या, लिखाण करणाऱ्या 879 पत्रकारांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. या वर्षी तब्बल 1993 पत्रकारांना धमक्या आणि मारहाण केली गेली. जगभरात  38 पत्रकारांचं अपहरण करण्यात आलं, तर 73 पत्रकारांनी जीवाच्या भीतीनं देश सोडून पलायन केलं.

मध्य पूर्वेतील दांडगाई
मध्य पूर्वेतील देश विशेषत: सीरिया आणि उत्तर आफ्रिकन देश तर पत्रकारांसाठी काळच ठरलेत.  या देशांमध्ये सर्वाधिक म्हणजे 26 पत्रकारांची हत्या झाली. आशिया खंडात 24 पत्रकार तर आफ्रिकन  देशांमध्ये 21 पत्रकारांना ठार मारण्यात आलं.

इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट आणि रिपोर्टर विदाऊट बॉर्डर या संघटना 1995 पासून जगभरातील रिपोर्टरच्या मृत्यूंची आकडेवारी गोळा करण्याचं काम करतेय. मात्र गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीचा विचार करता या वर्षीची संख्या धक्कादायक आहे. 2011मध्ये जगभरात मारल्या गेलेल्या पत्रकारांची संख्या होती 67, 2010 मध्ये 75 तर 2007मध्ये जगभरात 87 पत्रकारांचा खून करण्यात आला होता.

2012ला ठार झालेले पत्रकार मुख्यत: बॉम्बस्फोट, गृहयुध्दाचं वार्तांकन करताना मारले गेलेत, तर उर्वरित दहशतवाद्यांच्या, ड्रग माफियांच्या हल्ल्यात मारले गेलेत.

पत्रकारांसाठी मृत्यूचा सापळा ठरलेले देश

सीरिया

गेल्या वर्षभरापासून या देशात गृहयुध्दाची परिस्थिती आहे, बाशीर अल असाद सरकारविरुध्द सशस्त्र क्रांती सुरू आहे. असाद सरकारनं विदेशी पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी मज्जाव केलाय. मात्र तरीही अनेक पत्रकार छुप्या मार्गानं वार्तांकन करताहेत. आतापर्यंत सीरियामध्ये जगभरातील 17 पत्रकार ठार झालेत. सीरियातील 44 स्थानिक पत्रकारांची हत्या झालीय. मात्र तरीही या देशात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची संख्या कमी झालेली नाही. 'संडे टाईम्स'ची मारीया कोल्विन, पुलित्झर पुरस्कार विजेता पत्रकार अॅंथोनी शादीद या ज्येष्ठ पत्रकारांना मारण्यात आलंय.

सोमालिया

कायम गृहयुध्दाची परिस्थिती असलेल्या सोमालियात पत्रकारिता करणं हे मोठं आव्हान आहे. दरवर्षी डझनाहून अधिक पत्रकार या देशात मारले जातात. या वर्षी सोमालियात 18 पत्रकारांची हत्या झालीय. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. यापैकी बहुतांश पत्रकारांचा मृत्य़ू हा अल शबाब या कडव्या कट्टरपंथी संघटनेच्या हल्ल्यात झालाय, तर उर्वरित पत्रकारांना सरकारी यंत्रणेनं ठार केलंय.  गेली 20 वर्षं इथं स्थिर सरकार नाही. त्यामुळं पत्रकारांच्या मृत्यूमध्ये घट होत नाहीये.

पाकिस्तान

दहशतवादी हल्ल्यांच्या संख्येत वाढ झालेल्या पाकिस्तानमध्ये पत्रकारिता करणं कठीण होऊन बसलंय. या वर्षी जवळपास 10 पत्रकार ठार केले गेलेत. स्वात आणि बलुचिस्तानमध्ये कट्टरवाद्यांची संख्या वाढलीय. पोलिओचं लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केलीय.

मेक्सिको

ड्रग माफियांचा दहशतवाद मोडून काढण्यात मेक्सिकन सरकारला अद्यापही यश आलेलं नाही. ड्रग माफियांचे बुरखे फाडणाऱ्या सहा पत्रकारांची हत्या या वर्षी करण्यात आलीय.

ब्राझील

ब्राझीलमध्येही ड्रग माफियांचा पर्दाफाश करणाऱ्या पाच पत्रकारांचा खून करण्यात आला, सीमेपलीकडून  होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर या पत्रकारांनी लिहिलं होतं. तर दोन पत्रकारांना स्थानिक प्रशासनाविरुध्द लिहिल्यानं संपवण्यात आलंय.

वाढते मृत्यू

गेल्या दोन वर्षांची आकडेवारी बघता या वर्षी पत्रकारांच्या मृत्यूच्या संख्येत जवळपास 33 टक्क्यांनी वाढ झालीय. गेल्या वर्षी विविध घटनांमध्ये 67 पत्रकार ठार झाले होते, तर या वर्षी ही संख्या 88 वर पोहोचलीय. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जगभरात तुरुंगात डांबल्या गेलेल्या पत्रकारांच्या संख्येत जवळपास 16 टक्क्यांनी घट झालीय. 2011 या वर्षी जगभरात 1044 पत्रकारांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. या वर्षी ही संख्या 870वर गेलीय. पत्रकारांना धमकावण्याच्या आणि मारहाण करण्याच्या संख्येत 2 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी जगभरातल्या 1959 पत्रकारांना मारहाण करण्यात आली होती. तर या वर्षी 1993 पत्रकारांना मारहाण झाल्याचं स्पष्ट झालंय. पत्रकार अपहरणाच्या घटना 46 टक्क्यांनी कमी झाल्यात. या वर्षी 38 पत्रकारांचं अपहरण करण्यात आलं. त्या तुलनेत 2011 या वर्षात 71 पत्रकारांचं अपहरण केलं गेलं. 2012 या वर्षी मायदेश सोडून जाव्या लागणाऱ्या पत्रकारांची संख्या 73 वर गेलीय. गेल्या वर्षी 77 पत्रकारांना मायदेश सोडून जावं लागलं होतं. नेटिझन्स आणि सिटिझन पत्रकारांच्या मृत्यूंमध्ये या वर्षी मोठी वाढ झाली. 2012 ला तब्बल 47 नेटिझन्स आणि सिटिझन जर्नलिस्टची हत्या करण्यात आली. 144 नेटिझन्सना या वर्षात तुरुंगात डांबण्यात आलं.

                                            2011       2012           Change
मारले गेलेले पत्रकार                     66           88               +33%
अटक झालेले पत्रकार                    1044        879             -16%
मारहाण आणि धमक्या                 1959        1993           +2%
अपहृत पत्रकारांची संख्या                71            38              -46%
मायदेश सोडावे लागलेले पत्रकार        77            73              -5%
ठार झालेले नेटिझन्स                    5              47              +840%
अपहृत नेटिझन्सची संख्या               199         144             -27%


पत्रकारांना तुरुंगवास

जगभरातील अनेक तुरुंगांमध्ये या वर्षी मोठ्या प्रमाणात पत्रकारांना डांबण्यात आलं. 879 पत्रकारांना अटक करण्यात आली. अनेक देशांच्या सत्ताधाऱ्यांनी तर अटक केलेल्या पत्रकारांचं काय केलं, हे सांगायलाही नकार दिलाय. सरकारी ध्येयधोरणांविरु्दध टीका करणं, भ्रष्टाचार उघड करणं, ही अटकेमागची प्रमुख कारणं आहेत. सध्या 193 पत्रकार जेलमध्य़े आहेत. पत्रकारांसाठी कर्दनकाळ ठरलेले  टॉप जेलर देश पुढीलप्रमाणे -  

तुर्कस्थान

पत्रकारांना अटक करणाऱ्या देशांत तुर्कस्थान अग्रेसर आहे. या वर्षी तुर्की सरकारनं विविध गुन्ह्यांखाली 49 पत्रकारांची जेलमध्ये रवानगी केलीय. यामध्ये सरकार उलथवून टाकण्याचा कट केल्याचा आरोप बहुतांश पत्रकारांवर ठेवण्यात आलाय.

इराण

सरकारी ध्येयधोरणांवर टीका करणाऱ्या तब्बल 45 पत्रकारांना इराणमध्ये जेलचा रस्ता दाखवण्यात आलाय. इराणीयन वूमन्स क्लब या लोकप्रिय वेबसाईटच्या संपादक झिला बानी यांनाही जेलमध्ये डांबण्यात आलंय.

चीन

ऑनलाईन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांसाठी चीन सरकार काळ ठरलंय. या वर्षी सरकारविरुध्द लिखाण करणाऱ्या 32 पत्रकारांना विविध गुन्ह्यांखाली तुरुंगात टाकण्यात आलंय. यापैकी नऊ पत्रकार तिबेटमधील आहेत. सरकारविरुध्द लिहिणाऱ्या 'अल जजिरा'च्या पत्रकारांचा व्हिसाही सरकारनं रद्द केला होता. या शिवाय 'न्यूयॉर्क टाइम्स'नं तत्कालीन राष्ट्रपतींच्या संपत्तीविषयी शोधवृत्तमाला चालवली. त्यामुळं सरकारनं त्यांची वेबसाईटच बंद करून टाकली.

इट्रिया

या आफ्रिकन देशानं या वर्षी कोणताही गुन्हा दाखल न करता 28 पत्रकारांना सरळ तुरुंगात डांबलं. आजपर्यंत कोणत्याही पत्रकाराला कोर्टात उभं करण्यात आलं नाही किंवा आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही. सरकारनं या अटकेबद्दल कुठलीही माहिती देण्यास साफ नकार दिलाय.

सीरिया

गृहयुध्द झेलणाऱ्या बशर अल असाद सरकारनं पत्रकारांची गळचेपी करत तब्बल 15 पत्रकारांना अटक केली. अजूनही कोणत्याच पत्रकारावर आरोपपत्र किंवा गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. त्यांचं काय झालं, याबाबत अजून काहीही माहिती नाही.

व्हिएतनाम

सरकारी धोरणांविरुध्द लिहणाऱ्या 14 पत्रकारांना सरकारनं तुरुंगात धाडलंय.

अझरबैजान

नऊ पत्रकारांना अझरबैजान सरकारनं तुरुंगाचा रस्ता दाखवलाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाईन लिखाण करणाऱ्या पत्रकारांचा समावेश आहे.

इथिओपिया

2009मध्ये इथिओपियन सरकारनं दहशतवादविरोधी कायदा पास केलाय. या कायद्याअंतर्गत सरकार, सत्ताधारी पक्षाविरुध्द लिखाण करणं गुन्हा ठरवण्यात आलाय. या कायद्याअंतर्गत आतापर्यंत सहा पत्रकारांना अटक करण्यात आलीय.

उझबेकिस्तान

चार पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आलंय.

सौदी अरेबिया

इथं सत्ताधाऱ्यांवर टीकात्मक लिहिणाऱ्यांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात येते. या वर्षी सौदी सरकारनं चार पत्रकारांना पकडलंय.  यात लोकप्रिय स्तंभलेखक हमजा कशगरी याला व्टिटरवर पोस्ट केल्याबद्दल मृत्युदंडाच्या शिक्षेची शिफारस करण्यात आलीय. तुरुंगवासातच लोकप्रिय ब्लॉगर सत्तार बहेश्ती यांचा मृत्यू झालाय.


Comments (5)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.