आता समतेचं गाणं गाऊ

राहुल विळदकर, अहमदनगर
'आम्ही पिढ्यान-पिढ्या पोळलोय, आता मलम लावा...' अशा अपेक्षांपेक्षा, 'आम्ही हत्यारांनी केव्हाच विरोध केला असता, पण ती आमची संस्कृती नाही. आता आम्ही डोक्यानंच तुमच्या डोक्याशी लढायला तयार आहोत. तेव्हा तथाकथित बुद्धिवाद्यांनी सावध राहावं, समतेचा बुलडोझर येत आहे'.., अशा गर्जनांनी यंदाचं विद्रोही साहित्य संमेलन दणाणलं. मला वाटतं विद्रोही विचारांनी घेतलेलं हे वळण काळानुरुप आहे...

SHAHIR-KAVANअहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीत दोन दिवस , १९ आणि २० जानेवारीला ११वं विद्रोही साहित्य संमेलन मोठं झोकात पार पडलं. संत गाडगेबाबा आश्रमशाळेत राहण्या-खाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी नगर-मनमाड हायवे अडवून राज्यभरातल्या विद्रोही कार्यकर्त्यांनी आपला प्रतिसाद दाखवून दिला. हाही एक विद्रोहाचाच प्रकार!

'आता रडत बसायचं नाही, तर वारच करायचा..' अशा टाळ्याखाऊ वाक्यांचा जमाना गेला. 'आता समतेचं गाणं गाऊ, आधी आपण सुधरू..', अशी आत्मचिंतनाची कवनंही या संमेलनात ऐकायला मिळाली. संमेलनाच्या उद्घाटनाच्या भाषणांमध्ये आदिवासी, कष्टकरी, शेतमजूर यांच्या जगण्याचे पडसाद उमटले. 'आम्ही पिढ्यान-पिढ्या पोळलोय, आता मलम लावा...' अशा अपेक्षांपेक्षा, 'आम्ही हत्यारांनी केव्हाच विरोध केला असता, पण ती आमची संस्कृती नाही. आता आम्ही डोक्यानंच तुमच्या डोक्याशी लढायला तयार आहोत. तेव्हा तथाकथित बुद्धिवाद्यांनी सावध राहावं, समतेचा बुलडोझर येत आहे'.., अशा गर्जनांनी विचारमंच दणाणला. त्यावेळी या संमेलनाचं वेगळेपणच जाणवलं. पण भाषणबाजी लांबलीच. अध्यक्षांनी मात्र मुद्देसूद विचारमांडणी केली. 'वर्षानुवर्षे जातिभेदांची उतरंड मोजत बसण्यापेक्षा, गुणवत्तेचे सोपान बांधून हक्कांचं तोरण मिरवू', असा आत्मविश्वास व्यक्त केला गेला.

दुसरीकडं 'पोटात असंल, तरच ओठात येतं' या म्हणीचाही प्रत्यय आला. जेवणासाठी एकदम गर्दी उसळलेली...साधं भात-आमटी आणि भाजीचं जेवण. नियोजनाअभावी व्यवस्था कोलमडली. आता विद्रोही कार्यकर्त्यांनं असलं इव्हेंट मॅनेजमेंटही आत्मसात करावं लागेल. असो साहित्य सोडून बाकी सगळं काही मिळणाऱ्या अखिल भारतीय संमेलनांना नाही तरी लोक जाम वैतागलेत. त्यामुळं विद्रोही संमेलनांसारख्या विचारांचा खरा जागर करणाऱ्या संमेलनांकडं मोठ्या आशेनं पाहिलं जातंय.

पहिल्या दिवशीचं पहिलंच सत्र स्त्रियांच्या विषय़ावरील परिसंवादाला देऊन संयोजकांनी वाहवा मिळवली. वक्त्या पाचच. पण दाही दिशांतल्या पुरुषी व्यवस्थेला हादरवणारे विचार त्यांनी मांडले. समतेच्या गप्पा आता आमच्याशी करा. कारण आम्हीच आता आमची दिशा ठरवणार, पुरुष नाही... असं या वक्त्यांनी ठणकावलं.
आदिवासींच्या स्त्री गीतांमधून वेदनांना उद्गार मिळाला. त्या गाण्यांचा अर्थ कॉ. वाहरू सोनवणेंनी उलगडून सांगितला. 'आमचे कपडे, भाषा आणि कंदमुळांचं खाणं एवढीच संस्कृती पाहून धन्य नका होऊ. तर जमिनीला घट्ट धरून जगण्याचं आमचं भान पाहा. विस्कटू पाहणारी नाती पाहा', असा त्या कवितांचा भावार्थ होता.
बोधचिन्हाचा अर्थ सांगणारा 'होय आम्ही राक्षस आहोत', असं ठणकावणारा एक विषय संमेलनात होता. पण रक्षण करणारा तो राक्षस. तोच खरा कृषी संस्कृतीचा राखणदार, ही कल्पनाच वक्त्यांना पटवता आली नाही. तरीही विषयाची निवड आणि मायने भन्नाटच होते!

त्यानंतरचं कविसंमेलन मात्र धारदार झालं. संमेलनातलं एक वैशिष्ट्य म्हणजे बाल-कुमारांसाठी स्वतंत्र असा मुक्ता साळवे बालमंच उभारण्यात आला होता. शाहिरी जलसा, अभिनेते नंदू माधव, राजकुमार तांगडे आणि शाहीर संभाजी भगतांनी दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र गाजवलं. पुढच्याच सत्रातला 'जातिअंताचा लढा' हा परिसंवादही विचारांची खोली काय असते, ते सांगणारा ठरला. 'आम्हीच ही पृथ्वी उभारली, त्यात आम्हीच शूद्र ठरवले गेलो आणि आता आम्हालाच संपवायची भाषा चाललीये. यालाच संस्कृती म्हणायचं असेल, तर असल्या सडलेल्या संस्कृतीपेक्षा विद्रोह करूनच नवी संस्कृती घडवू या', असा क्रांतिकारी विचारही त्यात मांडण्यात आला. संत-महात्म्यांनी जातिवादाविरोधात लढा दिला. आता त्या यशावरून पुढची दिशा ठरवूया, असाही या परिसंवादाचा सूर होता. त्यानंतरच कथाकथन अपेक्षेएवढं गाजलं नाही. मात्र गटचर्चा आणि मांडणीतून बाहेर आलेले विचार आत्मपरिक्षणाबरोबरच, काटेकोर समाजनिरीक्षणाचेही होते. तथाकथित मनोरंजन विश्व आणि विषमता, ब्राह्मणी, भांडवली, शिक्षणप्रणाली, अभिजनांच्या बोली भाषेची विविधता आणि बहुजन-प्रतिकांचे वैदिकीकरण हे सगळेच विषय गटप्रमुखांनी हिरिरीने मांडले.त्याचे अस्वस्थ करणारे पुरावेही दिले. नंतरच्या सत्रात ठराव वाचनानं आणि प्रमुख वक्त्यांच्या विचार मंथनानं संमेलनाचा समारोप झाला. काही किरकोळ अपवाद वगळता संमेलन चांगलंच यशस्वी झालं. पुस्तक प्रदर्शनातही बरचसं वैविध्य होतं.

प्रसारमाध्यमांनी विशेषतः प्रिंट मीडियानं संमेलनाला प्रसिद्धी बऱ्यापैकी दिली. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मात्र संमेलनाकडं फिरकलेही नाहीत. समाजाचं प्रतिबिंब म्हणून मिरवणाऱ्या मीडियाचं हे वागणं काही बरं नव्हं! असो. असं असलं तरी ग्रामीण भारत आणि शहरं यांना जोडण्याचं काम करणाऱ्या 'भारत४इंडिया'नं संमेलनाच्या अगदी पहिल्या सत्रापासून ते समारोपापर्यंत सगळ्या वृत्तांत आपल्यापर्यंत पोहोचवला. कारण ज्यांना चेहरा नाही, आवाज नाही त्या कष्टकऱ्यांचा पिचलेला, दबलेला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा वसाच आम्ही घेतलाय. विचारांचा हा प्रवाह आता असाच वाहत राहील. आमच्या बापाची गाणी कधी गाणार, या शाहीर संभाजी भगतांच्या प्रश्नाला एक ना एक दिवस तरी लता मंगेशकरांना उत्तर द्यावंच लागेल. घरात बसून रानातलं गाणं लिहिणारे राजकवी होण्यापेक्षा, रानात राबून मनातलं गाण लिवणारेच आता जनकवी होतील. लोकहो, ही बदलत्या काळाची पावलं आहेत. थोर गांडुळांच्या भोंदू जमावाला खरंचंच लोक वैतागलेत. आणि जे सुचलं ते लिहिलं असं बरळणाऱ्यांपेक्षा, जे बोचलं ते कागदावर उतरवंलय, असं कळकळीनं सांगणाऱ्यांच्या हातातच उद्याचा भविष्यकाळ असेल. राहुरीच्या विद्रोही संमेलनानं पेटवलेली हीच खऱ्या सांस्कृतिक क्रांतीची ज्योत आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.