योजना

प्रदर्शनाच्या दुसरा दिवसही गर्दीचा

पुणे - किसान कृषी प्रदर्शनासाठी गावोगावचे शेतकरी पुण्यनगरीत येतायत. दुसऱ्या दिवशीही प्रदर्शन स्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झालीय. शिवाजीनगरहून येणाऱ्या बसगाड्या खच्चून भरून येतायत. अनेक शेतकरी परिवारासह मोठ्या उत्सुकतेनं प्रदर्शन पाहात आहेत. हे प्रदर्शन साधंसुधं नाही, संपूर्ण प्रदर्शन काळजीपूर्वक पाहायचं झालं तर दिवस पुरत नाही. 

याचा अनुभव गाठीशी असल्यानं अनेकांनी दशमीचं गाठोडं सोबत आणलंय. शेतकऱ्यांना नवनवीन गोष्टी पाहण्याची किती ओढ आहे, हेच यावरून पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनात 1200हून अधिक स्टॉल्स असून अत्याधुनिक अवजारं, बियाणं, यांच्यासह शेतीविषयक ज्ञान देणाऱ्या पुस्तकांचे स्टॉल्स आहेत. सिंचनाची तर अनेकविध उपकरणं इथं पाहायला मिळतात. एवढंच कशाला ट्रॅक्टरचे कधी पाहिले नसतील एवढे प्रकार आहेत. याशिवाय प्रदर्शनात आणखी काय काय आहे, माहितेय...

किसान विशेष

शेतवाडीसाठी कुंपण - जंगली प्राण्यांपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी विद्युत लहरी कुंपणं. यामध्ये पीव्हीसी आवरण असलेल्या काटेरी तारा वापरण्यात आल्या आहेत. मधमाश्यांच्या पोळ्यासारखं हे कुंपण दिसतं.

कागदी लिंबू उत्पादन आणि प्रक्रिया - महाराष्ट्र राज्य लिंबू उत्पादक संघाकडून कागदी लिंबू लागवड व प्रक्रिया यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातंय. लिंबाच्या जाती- विक्रम, तेनाली, चक्रधर, साई सरबती.

वंडरफुल डाळिंब - शाश्वत कृषी विकास, पुणे व राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून वंडरफुल ही इस्रायली डाळिंबाची जात भारतात आणली आहे. या जातीचं सध्याच्या जातीपेक्षा अडीचपट जास्त उत्पादन आहे. तेल्या-मर रोगापासून मुक्त. इस्रायली शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. एक फळ जवळजवळ सव्वा किलोचं आहे.

पशुसंवर्धन - महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडून पशुसंवर्धन व कुक्कुटपालन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यात गाईच्या विविध ब्रीडची माहिती देण्यात येत आहे. गाई ब्रीड-  नागपुरी, खिल्लार, डांगी, गवळाऊ, लाल कंधारी, देवणी, जर्सी, होलस्टीन फिजीयन. शासनाच्या पशुधन विमा व कामधेनू दत्तक ग्राम योजनेची माहिती शेतकऱ्यांनी घेतली.

सोलर वॉटर पंप - भारनियमनाचा त्रास व इंधनाचा खर्च वाचवण्यासाठी चांगला पर्याय. 1 ते 10 एच.पी.चे पंप उपलब्ध. 400 फूट खोलीपासून पाणी ओढतो. केंद्र सरकारकडून 30 टक्के सबसिडी उपलब्ध.

पोस्ट हार्वेस्ट तंत्र - शेंगा फोडणी यंत्र, तांदूऴ पॉलीश, डाळ मिल यंत्र, मका सालने मशीन, कडबा कुट्टी, काजू प्रोसेसर, बटाटा हार्वेस्टर, बटाटा वेफर्स मशीन.

सरकारी योजनांची माहिती - 'किसान'मध्ये पहिलंच दालन आहे, महाराष्ट्र राज्य कृषी आणि पणन विभागाचं. या दालनात सरकार शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबवतं, याची माहिती देण्यात येते. पीक उत्पादन, मार्केटिंग आणि निर्यातीबाबत अधिकारी मार्गदर्शन करतात.

उच्च तंत्रज्ञानाची शेती - प्रदर्शनाच्या आवारात मोठमोठी ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट उभारली आहेत. वातावरण, हवामान (तापमान, आर्द्रता) कसं मेंटेन करायचं, हंगाम नसतानाही कशी पिकं घ्यायची, याची माहिती 'इंडिया ग्रीन हाऊस'च्या दालनात मिळते.

टिश्यू कल्चर - पाटील बायोटेकच्या स्टॉलवर टिश्यू कल्चरद्वारे तयार झालेला भलामोठा केळीचा घड आणि उंचच उंच वाढलेला ऊस पाहायला मिळतो.

आधुनिक अवजारं - यंदाच्या प्रदर्शनात आधुनिक शेतीची औजारं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतायत. यात पॉवर टिलर, क्रॉप कटर, विविध स्प्रेअर, फॉगर यांचा समावेश आहे.

स्प्रे तंत्रज्ञान - फवारणी कशी केली पाहिजे, फवारताना काय काळजी घ्यायची, फवारण्यासाठी कोणत्या पिकाला कोणता स्प्रेअर आणि नोझल वापरायचा याची सर्वांगीण माहिती या स्टॉलवर मिळते. यातील 'ड्रॅगोन वाईनयार्ड स्प्रेअर' आधुनिक शेतकऱ्याचं लक्ष वेधून घेत आहे. विविध स्प्रे-पंपाची माहिती घेण्यासाठी 'एएसपीपीईई' (आसप्पी)च्या दालनात शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

ट्रॅक्टर – प्रदर्शनात विविध नामवंत कंपन्यांचे आधुनिक ट्रॅक्टर पाहायला मिळतायत. इथं या ट्रॅक्टर्सचं अॅडव्हान्स बुकिंगही करता येतं. आयशर, न्यू हॉलंड, महिंद्रा, इंटरनॅशनल, फोर्स ट्रॅक्टरची इथं राईडही मारता येते.

मोटरपंप - विविध इलेक्ट्रिक पंपांची आणि सबमर्शीबल पंपांची दालनं या प्रदर्शनात पाहायला मिळतायत.

सिंचन - राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाचं खास दालन प्रदर्शनात उभारण्यात आलंय. जैन इरिगेशन, फिनोलेक्सच्या स्टॉलवर गर्दी. ठिबक-तुषार सिंचनाची माहिती.

सोलर एनर्जी - प्रदर्शनाची सोलर उत्पादनाची विविध दालनं आहेत. सोलरवर चालणारी बॅटरी, हिटर, लाईट याबाबत शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. त्यामुळं या दालनांमध्ये गर्दी दिसतेय.

कृषी विद्यापीठांचे स्टॉल – 'किसान'मध्ये कृषी विद्यापीठांनीही स्टॉल लावले आहेत. इथं विद्यापीठांमध्ये होणाऱ्या संशोधनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.

पाणी तपासणी कीट – राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचाही स्टॉल प्रदर्शनात आहे. पिण्याचं पाणी तपासण्याचं प्रात्यक्षिक इथं शेतकऱ्यांना दाखवण्यात येतं.

बी-बियाणे, खतं, औषधं - नामवंत अशा बी-बियाणं, पेस्टिसाईड आणि खत कंपन्यांचे स्टॉल्स प्रदर्शनात आहेत. विविध कीटकनाशकं, रोगनाशकं, तणनाशकं, संजीवकांची माहिती शेतकऱ्यांना मिळते.

फ्लोरिकल्चर – 'किसान'मध्ये फुलझांडांची बियाणं आणि रोपांचे विविध स्टॉल आहेत. ऑर्किड, जरबेरा, कार्नेशन, लिलीअम, बर्ड ऑफ पॅराडाईजची फुलं शेतकऱ्याचं; तसंच शहरी लोकांचं लक्ष वेधून घेतात.

सीताफळाचा शेक - राज्य सीताफळ महासंघाच्या स्टॉलवर सीताफळाचा मिल्क शेक नाममात्र दरात उपलब्ध आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीचं आणि प्रक्रियेचं इथं मार्गदर्शन केलं जातं.

शेतीच्या फिल्म्स् - प्रदर्शनात खास किसान फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. पीक लागवड तंत्रज्ञान, उत्पादन, मार्केटिंग, प्रक्रिया, निर्यात अशी उपयुक्त माहिती इथं डॉक्युमेंटरीद्वारे दिली जात आहे. हा हॉल शेतकऱ्यांच्या गर्दीनं खच्चून भरला आहे.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.